27.3 C
New York
Monday, August 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

वाढोना येथे १५ फुटांच्या उभ्या बुद्ध मूर्तीची तोडफोड; बौद्ध समाजात संतापाची लाट

 वाढोना येथे १५ फुटांच्या उभ्या बुद्ध मूर्तीची तोडफोड; बौद्ध समाजात संतापाची लाट

हिंगोली | प्रतिनिधी

सेनगाव तालुक्यातील वाढोना येथे तक्षशिला बौद्ध विहार परिसरात उभी असलेली सुमारे १५ फुटांची भगवान गौतम बुद्धांची भव्य मूर्ती अज्ञात समाजकंटकांनी फोडून तिचा काही भाग जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे बुद्ध जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने बौद्ध समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्षशिला बुद्ध विहाराचे प्रमुख भिक्खू बुद्धकिर्ती हे धम्मकार्याच्या निमित्ताने मुंबई येथे गेले होते. दरम्यान, सोमवार दि. ०४ मे २०२६ रोजी सकाळी उपासक वंदनेसाठी विहारात आले असता ही तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

भिक्खू बुद्धकिर्ती यांच्याशी चर्चा केल्यानंतर सेनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक मस्के यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, लिगल सेलचे महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते, जिल्हाध्यक्ष राजू इंगोले, जिल्हा महासचिव सिद्धांत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते डॉ. चंद्रमुणी पाईकराव, तालुका सचिव संजय वाकळे, आकाश कांबळे, ॲड. प्रज्ञावंत मोरे, यशवंतराव साळवे, रक्षक गायकवाड यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या घटनेमुळे संपूर्ण बौद्ध समाजात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. आरोपींना आठ दिवसांत अटक न झाल्यास हिंगोली जिल्हा बंदचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!