साहित्यप्रेमी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व पी. बी. पिसाळ यांचे निधन : साहित्य क्षेत्राची मोठी हानी
मुंबई भाईंदर : गोल्डमॅन म्हणून परिचित असलेले रोहित पिसाळ यांचे वडील पी. बी. पिसाळ यांचे दिनांक २८ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता भाईंदर येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, साहित्यविश्व आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पी. बी. पिसाळ यांनी संरक्षण खात्याच्या महालेखापरीक्षण विभागात अधिकारी म्हणून प्रामाणिक, शिस्तबद्ध व कर्तव्यदक्ष सेवा बजावली होती. सचोटी, मेहनत आणि कुटुंबवत्सल स्वभाव यामुळे त्यांचा सर्वत्र आदर होता. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर परिश्रम घेतले आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला वाहून घेतले.
मुलांना उत्तम शिक्षण, चांगले संस्कार, प्रामाणिकपणा आणि समाजात मानाने जगण्याचे धडे त्यांनी दिले. त्यांच्या संस्कारामुळेच पिसाळ कुटुंबाने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पी. बी. पिसाळ हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते अभ्यासू, विचारवंत आणि साहित्यप्रेमी व्यक्तिमत्त्व होते. सन १९७१ मध्ये त्यांनी पाली पतसंस्थेची निर्मिती केली होती. समाजकार्य, अभ्यास आणि संघटन या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.
विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि वैचारिक विषयांवर त्यांनी एकूण १३ पुस्तकांचे लेखन केले. त्यांच्या घरात तब्बल २५०० पुस्तकांचे समृद्ध ग्रंथालय होते. वाचन, चिंतन आणि लेखन हा त्यांच्या जीवनाचा श्वास होता.
त्यांच्या लिखाणातील “आभाळ फाटलं” हे पुस्तक विशेष गाजले होते. समाजातील वास्तव, विषमता आणि मानवी वेदना यांना शब्दबद्ध करणारे हे पुस्तक वाचकांच्या मनाला भिडले होते. ते नेहमी राजकारणापासून अलिप्त राहिले, मात्र समाजप्रबोधनापासून कधीच दूर गेले नाहीत. बुद्ध धम्मावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. ते प्रभावी वक्ते सुद्धा होते. त्यांच्या भाषणात अभ्यास, तर्क, करुणा आणि सामाजिक भान यांचा सुंदर संगम असायचा.
जीवनभर त्यांनी जातीवादाचे अनेक चटके सहन केले, मात्र कधीही तत्त्वांचा मार्ग सोडला नाही. अन्यायाला विरोध आणि समतेचा आग्रह ही त्यांची ठाम भूमिका होती.
संस्कृत भाषेतील ” अश्वघोष सौंदरानंद” हे महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांनी मराठीत आणले. तसेच “लंकातार सूत्त १०१” या ग्रंथावरही त्यांनी अभ्यासपूर्ण काम केले. “रावणाचे बुद्धाला प्रश्न” या विषयावर त्यांनी लेखन सुरू केले होते; ९८ प्रश्न त्यांनी लिहिले आहेत, मात्र पुढे आजारपणामुळे हे पुस्तक अर्धवट राहिले.
त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली, दोन मुले , नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे सुपुत्र यश पिसाळ हे सध्या दुबई येथे कार्यरत आहेत. मुली अनुपमा जगताप व क्रांती काळेकर या सुद्धा उच्चशिक्षित असून महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या जाण्याने पिसाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. एक सुसंस्कृत पिता, प्रामाणिक अधिकारी, अभ्यासू लेखक आणि समतेचा विचार जपणारा माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्यावर उद्या दि. २९ एप्रिल रोजी भाईंदर येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.




