spot_img
spot_img
spot_img
spot_img

प्रभादेवीत जातीय द्वेषातून १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

प्रभादेवीत जातीय द्वेषातून १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर २४ तासांत आरोपी गजाआड

मुंबई | प्रतिनिधी

प्रभादेवी परिसरात जातीय मानसिकतेतून एका १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंशू कुमार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर दादर पोलिसांनी २४ तासांच्या आत गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्याचा रहिवासी असलेला अंशू कुमार गेल्या दोन वर्षांपासून प्रभादेवी येथील एका चहाच्या टपरीवर काम करत होता. तो आपल्या गावातील वीरेंद्र पाल व इतर काही तरुणांसोबत राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, अंशू हा आंबेडकरवादी विचारांनी प्रेरित होता. सामाजिक समता, विवेकवाद आणि मनुवादी विचारसरणीविरोधात तो निर्भीडपणे मत मांडत असे.

याच कारणावरून उच्चवर्णीय मानसिकतेतून वीरेंद्र पाल व त्याच्या सहकाऱ्यांमध्ये अंशूविषयी तीव्र राग होता. यापूर्वी सहा महिन्यांपूर्वीही त्याच कारणावरून अंशूला मारहाण करण्यात आली होती, अशी माहिती पुढे येत आहे.

दारू पाजून निर्घृण हत्या

दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी अंशूला दारू पाजून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अंशूच्या मृतदेहावर डोळे, डोके आणि गळ्यावर गंभीर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. ही हत्या केवळ वैयक्तिक वादातून नव्हे, तर जातीय द्वेषातूनच करण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक पाठपुरावा

या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दादर पोलीस ठाण्यात दाखल झाले. २ फेब्रुवारी रोजी सकाळी मुंबई प्रदेश उपाध्यक्ष राकेश बुवा कांबळे, मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्य आकाश अशोक दोडके, माजी उपाध्यक्ष अशोक गुजेट्टी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अंशूचे वडील सोनेलाल कुमार यांच्यासोबत पोलिसांची भेट घेतली.

अंशूचे वडील सोनेलाल यांनी हा खून पूर्वनियोजित असून यात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा केवळ खून नसून जातीयवादी आणि मनुवादी मानसिकतेचा परिणाम असल्याचा ठाम आरोप त्यांनी केला.

मानवीय जबाबदारी; टी स्टॉल मालकाकडून विमान खर्च

वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांमुळे संबंधित चहा टपरीच्या मालकाने अंशूचा मृतदेह आणि नातेवाईकांना उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे नेण्यासाठी संपूर्ण विमान प्रवासाचा खर्च उचलला. सोमवारी अंशूचे वडील आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन गावाकडे रवाना झाले.

“न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार”

पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान,

“अंशू कुमारला न्याय मिळेपर्यंत ही लढाई रस्त्यावर आणि न्यायालयातही सुरूच राहील,”
असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे नेते आकाश अशोक दोडके यांनी व्यक्त केला आहे.

समाजाला हादरवणारा प्रश्न

प्रभादेवीतील अंशू कुमारची हत्या ही केवळ एका तरुणाचा मृत्यू नाही, तर ती भारतीय समाजातील जातीय विषमता, मनुवादी मानसिकता आणि विचारस्वातंत्र्यावर होणाऱ्या हल्ल्यांचे भयावह वास्तव उघड करणारी घटना आहे.
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन समानतेची भाषा बोलणारा १९ वर्षांचा तरुण आज व्यवस्थेचा बळी ठरतो, ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

Epaper Website

Related Articles

आरएसएस मुख्यालयाजवळील संविधान चौकात आज एक महत्त्वपूर्ण आंदोलनाची सुरुवात.

आरएसएस मुख्यालयाजवळील संविधान चौकात आज एक ऐतिहासिक आणि निर्णायक आंदोलनाची सुरुवात झाली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मोठी राजकीय घडामोड

मुंबई, प्रतिनिधी :भोंदूबाबा आणि स्वतःला कॅप्टन म्हणवणाऱ्या अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांमध्ये अटक झाल्यानंतर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या मोठ्या अडचणीत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!