भंते गुरुधम्मो थेरो यांच्या अंतिम संस्कार प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजू खरे यांचे महत्त्वपूर्ण मनोगत “भंतेजींसारख्या धम्मवीरांसाठी सर्व सोयी-सुविधा युक्त स्मशानभूमी उभारली जावी” — एक लाख रुपयांची केली मदत.
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी दि. १
निळे प्रतीक न्यूज नेटवर्क-
जगप्रसिद्ध पुस्तक ‘जगातले आठवे आश्चर्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चे लेखक आणि थोर धम्मप्रवर्तक भंते गुरुधम्मो थेरो यांच्या पार्थिवावर बुधवारी बुद्ध लेणी परिसरात बुद्धिष्ट परंपरेनुसार अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजू खरे यांनी भंतेजींसारख्या थोर धम्माचार्यांसाठी स्वतंत्र, सुसज्ज आणि सन्मानपूर्वक स्मशानभूमी उभारण्याची गरज व्यक्त केली.
“धम्मचळवळीतील थोर भिक्खूंना आणि अनुयायांना अंतिम प्रवासातही सन्मान मिळायला हवा. यासाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी स्वतंत्र स्मशानभूमी निर्माण व्हावी,” असे खरे यांनी आपल्या मनोगतात म्हटले. या सामाजिक आणि धम्मिक उद्देशासाठी त्यांनी एक लाख रुपयांचे धम्मदान भदंत विशुद्धानंद बोधी यांच्या हातात सुपूर्द करून उपस्थितांना अंतर्मुख केले.
या वेळी भदंत बोधीपालो महाथेरो, विशुद्धानंद बोधी, भदंत करूणानंद महाथेरो, भदंत ज्ञानरक्षित, भाई भंतेजी, भंतेजी राहुला, डॉ. अरविंद अरविंद गायकवाड, उपायुक्त रंगनाथ वाघ, धनराज गोंडाने, सी.पी. पाटील, मेघानंद जाधव,रतनकुमार साळवे, राजाभाऊ सिरसाट, गंगाताई सुरडकर, यांच्यासह अनेक उपासक,उपासिका आणि भिक्खू संघ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वातावरण अत्यंत गंभीर, भावविवश आणि श्रध्देनत होते.
भंते गुरुधम्मो थेरो यांचे धम्म कार्य, लेखन व प्रचार-प्रसार यामुळे त्यांचे नाव जगभर पोहोचले होते. त्यांच्या स्मृतींना जपण्यासाठी आणि धम्म परंपरेला सन्मान देण्यासाठी स्मशानभूमीच्या उभारणीसारखी कृती ही काळाची गरज असल्याचे अनेक अनुयायांनी सांगितले.