पुणे प्रतिनिधी / पुण्यात एका तरुणावर महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
माहितीनुसार, आरोपी गौरी वांजळे हिने स्वत:ला वकील म्हणून ओळख देत पीडित तरुणाशी संपर्क वाढवला. गुंगी आणणारे औषध देऊन त्याच्यावर बळजबरी करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. अत्याचाराच्या दरम्यान आरोपी महिलेने तरुणाचे अश्लील फोटो काढले आणि त्याच्या आधारे त्याला पैशांसाठी ब्लॅकमेल करणे सुरू केले, असेही तक्रारीत नमूद आहे.
पीडित तरुण हा कोल्हापूरचा असून, आरोपी महिलेने पुण्यातील तिच्या घरी तसेच कोल्हापूरला जाऊनही बळजबरीचे प्रयत्न केल्याचे आरोप आहेत. इतकंच नाही, तर त्याला जबरदस्तीने काशी विश्वनाथ येथे नेऊन तिथेही अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नंतर या फोटोच्या आधारे “पैसे दिले नाहीत तर खोट्या प्रकरणात अडकवेन” अशी धमकी दिल्याचे पीडिताचे म्हणणे आहे. अखेर धमकी आणि अत्याचाराच्या मानसिक तणावाला कंटाळून पीडित तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.



