डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ‘डीजे–मुक्त’ साजरी करा;विवाह सोहळे अर्ध्या तासात पूर्ण करा, तिसऱ्या धम्म संगीतीत महत्त्वपूर्ण ठराव
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – बौद्ध समाजातील संस्कार, परंपरा आणि सामाजिक शिस्त यांना एकसंध दिशा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय धम्म संगीतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती डीजे–मुक्त साजरी करावी तसेच विवाह सोहळे अर्ध्या तासात वेळेवर पूर्ण करावेत यांसह अनेक महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
रामनगर, मुकुंदवाडी येथील तक्षशिला बौद्ध विहारात झालेल्या या धम्म संगीतीस अध्यक्षीय मंडळात टेक्सास गायकवाड, आचार्य रवींद्र भालशंकर, भिक्खू डॉ. एम. सत्यपाल, महास्थवीर राहुल खांडेकर, प्रा. डॉ. रवींद्र मुंद्रे, अशोक तीनगोटे, प्रा. सुधीर कांबळे आदींची उपस्थिती लाभली. दिवसभर चाललेल्या तीन सत्रांमध्ये बौद्ध संस्कार पद्धतीत एकरूपता, बौद्ध सण साजरे करण्याच्या पद्धती, ब्राह्मणी शब्दांचा त्याग करून पर्यायी बौद्ध शब्दावली विकसित करणे आणि पाली भाषेचा प्रसार वाढवणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अध्यक्षीय मंडळातील मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध जयंती उत्साहात पण डीजे–मुक्त पद्धतीने साजरी करण्याचा ठराव मांडला. पारंपारिक वाद्यांचा उपयोग, समाज प्रबोधनपर कार्यक्रम आणि देखावे यांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी प्रतिपादन केले.लग्न सोहळ्यांबाबत कमी वेळेत, शिस्तबद्ध आणि वेळेत पूर्ण होणाऱ्या विवाहपद्धतीची अंमलबजावणी करण्यावरही एकमत झाले. बौद्ध समाजाने व्यवहारातील ब्राह्मणी शब्दांना पर्यायी बौद्ध शब्द देऊन त्यांची अंमलबजावणी करावी, असा निर्णय घेण्यात आला.या संगीतीत सर्व ठराव मंजूर करून ते कठोरपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील चौथी धम्म संगीती ४जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार असून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
प्रास्ताविक धम्म संगीती प्रमुख अशोक सरस्वती नागपूर यांनी केले, तर आभार प्रा. भारत शिरसाट यांनी मानले. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक ज्येष्ठ बौद्धाचार्य व्ही. के. वाघ, आसाराम गायकवाड, सखाराम धानोरकर, सुनील वाकेकर, अरविंद अवसरमोल, कृष्णा साळवे, अनंत भवरे, भानुदास बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.



