नांदेड – सक्षम ताटे हत्या प्रकरणाने संपूर्ण नांदेड शहर हादरले असताना, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी आज सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना सांत्वन दिले. ही हत्या अत्यंत क्रूर असून, यातून उघडपणे दिसणारी जातीय मानसिकता समाजाला कलंकित करणारी असल्याचे अंजलीताईंनी यावेळी सांगितले.
अंजलीताई म्हणाल्या की, “सक्षम ताटे कुटुंबियांच्या डोळ्यातील वेदना कमी करणे शक्य नाही, परंतु न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी त्यांच्या खंबीर पाठीशी राहील.” त्यांनी कुटुंबियांचे मनोधैर्य वाढवत न्यायासाठी लढा पुढे नेण्याचा विश्वास दिला.
सक्षम ताटे यांची आंतरजातीय प्रेमप्रकरणातून भर शहरात हत्या करण्यात आल्याने नांदेडमध्ये तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे. पीडित तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रियसीने त्याच्या मृतदेहाशी विवाह करण्याचा घेतलेला निर्णय राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. या धाडसी निर्णयाचे बाळासाहेब आंबेडकर यांनी खुलेपणाने कौतुक केले होते आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ठाम पाठिंबा जाहीर केला होता.
आजच्या भेटीला राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणात अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेतली असून, दोषींविरुद्ध कठोर कारवाईसाठी आवाज बुलंद करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.



