छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी दि. २८ दौलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार लता बाळासाहेब दराडे हिला लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने तिच्या राहत्या घरीच रंगेहाथ पकडले. कारवाई न करण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. परिसरातील एका तरुणाने संशयाच्या कारणावरून आपल्या पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात पोलीस तक्रार दिली होती. ही चौकशी लता दराडे यांच्या जबाबदारीत आली. मात्र, कारवाई न करण्यासाठी पत्नी आणि तिच्या मित्राकडे प्रत्येकी १० हजार रुपयांची लाच मागितली गेली. लाचेची मागणी केल्यानंतर पीडित महिला व तिच्या मित्राने थेट एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार नोंदवली. प्राथमिक तपासात मागणीची खात्री होताच एसीबीने सापळा रचण्याचे ठरवले. केसात हात फिरवत, दिला इशारा २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सापळा रचण्यात आला. तक्रारदार दोघांनी लता दराडे यांच्या एमरॉल्ड सिटी, गारखेडा येथील घरात भेट देत २० हजार रुपयांची रक्कम दिली. लताने पैसे स्वीकारताच तक्रारदार महिलेनं ठरल्याप्रमाणे केसात हात फिरवून एसीबी पथकाला इशारा दिला. दोन मिनिटांतच पथकाने घरात शिरत लता दराडे हिला रंगेहाथ ताब्यात घेतले.या संपूर्ण सापळ्याचे नेतृत्व अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, संगिता पाटील,सुरेश नाईकनवरे,शशिकांत सिंगारे तसेच अंमलदार दीपक इंगळे, सचिन बारसे, रामेश्वर गोरे व सी. एन. बागूल यांनी ही कारवाई यशस्वी केली.



