मंत्री संजय शिरसाठ यांना प्रत्यक्ष पाल भेट देत तीव्र निषेध आंदोलन.
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना दिलेल्या निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे तब्बल २८ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्यानंतर वंचित बहुजन युवा आघाडी (पश्चिम) आक्रमक झाली आहे. या गंभीर प्रकाराच्या निषेधार्थ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या कार्यालयासमोर पाल भेट आंदोलन करण्यात आले.
दिनांक २५ नोव्हेंबर रोजी विद्यार्थी मेसमधील भाजीमध्ये शिजलेली पाल आढळून आली होती. हे दूषित भोजन विद्यार्थ्यांना वाढण्यात आल्यानंतर अनेकांना प्रकृती बिघडून रुग्णालयात दाखल करावे लागले. “जेवणाच्या निकृष्ट गुणवत्तेबाबत यापूर्वीही अनेकदा आंदोलने केली, तक्रारी दिल्या; मात्र प्रशासनाने कोणत्याही तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्याचेच हे दुर्दैवी आणि जीवघेणे परिणाम आज विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत,” असे पश्चिम अध्यक्ष राहुल मकासरे यांनी सांगितले.
घटनेच्या निषेधार्थ आज मंत्र्यांना प्रत्यक्ष पाल भेट देत आंदोलन करून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी आघाडीकडून पुढील ठोस मागण्या करण्यात आल्या. मेस चालकाचा ठेका तत्काळ रद्द करावा
त्याच्यावर विषबाधा करण्याचा गुन्हा दाखल करावा,हॉस्टेलचे होस्टेल वॉर्डन निलंबित करावे
जे विद्यार्थी मेस चालकाकडून खंडणी घेऊन असे प्रकार दडपतात, त्यांचा प्रवेश रद्द करण्यात यावा.
या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात पश्चिम अध्यक्ष राहुल मकासरे, उपाध्यक्ष निलेश बनकर यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.



