छत्रपती संभाजीनगर : शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जोर चांगलाच वाढला आहे. पक्षांतर्गत नाराजी, स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बैठकीत सतत डावलले जाणे आणि पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्याशी वाढलेले मतभेद यामुळे या चर्चांनी अधिक उधाण घेतले आहे.
राजेंद्र जंजाळ सध्या पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याची चर्चा आहे. “बैठका, निवड प्रक्रिया किंवा संघटनात्मक निर्णय—कुठेही मला बोलावलं जात नाही,” असा आरोप त्यांनी खुलेपणाने केला आहे. नुकतेच शिंदे सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर, आता जंजाळांच्या संभाव्य निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना जंजाळ म्हणाले कि,
“मी या सर्व गैरकारभाराची तक्रार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे. मला पक्षप्रमुख नक्की न्याय देतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, महापालिका निवडणुका जवळ आल्याने शिंदे सेनेतील अस्मितेचा आणि निष्ठेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. माजी महापौर, माजी नगरसेवकाचा शिदेसेना प्रवेशा नंतर, शिंदेसेनेत अंतर्गत कलह वाढला आहे. राजेंद्र जंजाळ यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यास, शिंदे सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राजेंद्र जंजाळ नेमका कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांतील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.



