छत्रपती संभाजीनगर | दि. २६ “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर घटना समितीने विश्वास टाकून मसुदा समितीची जबाबदारी सोपवली नसती आणि त्यांनी भारतीय संविधान लिहिले नसते, तर 1980 च्या दशकातच भारताचे चार तुकडे झाले असते,” असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षा व विचारवंत डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी संविधान दिनाच्या कार्यक्रमात केले.
निजाम बंगल्याच्या क्रमांक 7, 8, 9, 10 या बंगल्यांजवळील मैदानात सामाजिक न्याय व संविधान संवर्धन महासंघ आणि ख्रिस्ती कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित संविधान दिन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून सर्व धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते.
बौद्ध धर्मगुरू भंते श्रद्धारक्षित, हिंदू धर्मगुरू मा. ह.भ.प. मस्के महाराज, ख्रिस्ती धर्मगुरू विशाल अनिल ढाके, मुस्लिम धर्मगुरू मौलाना सय्यद अन्वर अली आणि शीख धर्मगुरू वीरयाम सिंग यांनी उपस्थित राहून एकात्मतेचा संदेश दिला.
डॉ. कांबळे म्हणाले, “घटना समितीतील 493 सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह आठ सदस्यांची मसुदा समिती बनवली. जगातील विविध घटनांचा सखोल अभ्यास असलेल्या या सदस्यांनी बाबासाहेबांच्या असामान्य बुद्धिमत्तेची जाण ठेवून त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले. बाबासाहेबांनी या देशातील आठ हजार जाती, आठ हजार संस्कृती आणि प्रमुख आठ धर्म यांच्या मानसिकतेचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून सर्वांना स्वाभिमानाने जोडणारे संविधान दिले.”
ते पुढे म्हणाले, “बाबासाहेबांवर बालपणापासून सामाजिक अन्याय झाला; तरीही त्यांनी कोणत्याही जातीबद्दल कटुता राखली नाही. मानवतेच्या करुणेवर आधारित असल्यामुळे भारतीय संविधान जगात सर्वोत्तम मानले जाते. भारतीय स्त्रियांना समानतेचा अधिकार देणारे पहिले संविधान म्हणजे भारतीय संविधान. ग्रेट ब्रिटनमध्ये देखील स्त्रियांसाठी समानता 1953 मध्येच उपलब्ध झाली. म्हणजेच बाबासाहेबांचे संविधान जगापुढे आदर्श ठरले आहे.”
यावेळी शहर विकास अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी सांगितले, “डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच हा देश टिकून आहे. त्यांनी सर्व धर्म, सर्व जातींचा स्वाभिमान उंचावला.”
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मुकुंददादा सोनवणे म्हणाले, “हजारो वर्षे शोषित असलेल्या स्त्री समुदायाची खरी मुक्ती बाबासाहेबांच्या संविधानामुळेच झाली.”
या समारंभाचे उद्घाटन पोलीस सहआयुक्त मा. भाग्यरथी पवार यांच्या हस्ते झाले. छावणी परिषदेच्या मुख्य लेखाधिकारी सौ. वैशाली केनेकर यांनी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाला सेवंथ डे ॲडव्हेंटिस्ट स्कूलचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, विपश्यना बुद्ध विहार महिला मंडळ, तसेच प्रा. मनोहर लोंढे, अॅड. विकास पाटील, विजय खोतकर, प्रा. प्रताप कोचुरे, प्रा. अरविंद धाबे, डॉ. अर्चना धावे, हाजी इमरान नेहरी, जी. एन. खंडाळे, महेश तांबे, धनराज गोंडाने, प्रा. मोहन सौंदर्य, साहेबराव रोडगे, अशोक साळवे, बन्सी दांडगे, अनिल चाबुकस्वार, नागेश मोटे, बी. बी. लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय (गुड्डू) निकाळजे यांनी केले, तर सूत्रसंचालन महाराष्ट्रातील विख्यात भीमगायक गौतम जाधव यांनी केले.
आयोजक नगरसेविका आशाताई निकाळजे, विजय निकाळजे व प्रा. मनोहर लोंढे होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन हिवाळे, संदीप पगारे, जयश भालेराव, विल्सन गायकवाड आणि दिवे दादा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



