बुलढाणा,(प्रतिनिधी)-
सरन्यायाधीश हे भारताचे सर्वोच्च पद आहे. या पदाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम प्रामाणिक व्यक्तीच करू शकते. भूषण गवई यांना ही संधी मिळाली. सध्या सरकारच अन्यायकारी झाले आहे. गवई हे वास्तवतेला धरून निर्णय घेत संविधान रक्षक बनू शकले असते. बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांचेच आहे, याचे भक्कम पुरावे आहेत. त्यावरही सच्चा निर्णय गवई यांना देता आला असता, असे परखड मत भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांनी बुलढाणा येथे व्यक्त केले.
प्रबुद्ध भारत घडविण्यासाठी मूकनायक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी २२ नोव्हेंबर २०२५ ला जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित केली. धम्मबांधवांच्या सहकार्याने सलग दुसऱ्या वर्षी जागतिक स्तरावरील बौद्ध धम्म परिषद जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर घेण्यात आली.
जागतिक कीर्तीचे धम्मगुरु, बुद्ध तत्वज्ञान अभ्यासक, संशोधक, तथागतांचा मानवतावादी जागतिक कल्याणाचा प्रज्ञा, शील, मैत्रीचा संदेश आपल्या पांडित्यपूर्ण आणि करुणामय वाणीने जगभर प्रचार, प्रसार करणारे पूज्य भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांनी मानवी कल्याणासाठी तथा विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत विनयशील व विज्ञानवादी समाज घडविण्यासाठी धम्मदेसना दिली.
यावेळी भन्ते ज्ञानरक्षित थेरो, भन्ते उदितज्ञान थेरो, भन्ते यश थेरो, भन्ते धम्मसेन थेरो, भन्ते पुण्ण, भन्ते वेण धम्म चेती, भन्ते गुणानंद अभिभू यांची मंगल उपस्थिती होती. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गजानन घिरके, ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब जाधव यांची उपस्थिती होती. भिक्खू संघाच्या मंगल वाणीतून बुद्धांचे विचार श्रवण करण्यासाठी जिल्हाभरातून बौद्धबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकरा प्रतिभावंतांचा भंतेजींच्या व प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत मुकनायक फाऊंडेशन पुरस्कार देऊन संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांचे हस्ते गौरविण्यात आले.
मुकनायक फाऊंडेशनने जनसेवेत रूग्णवाहीका आणण्यात आली असून त्यांचे लोकार्पण भंतेजींच्या हस्ते करण्यात आले.
वितरणानंतर भन्ते गुणानंद अभिभू यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन आणि बळकटीकरण या विषयावर धम्मदेसना दिली. भन्ते यश थेरो यांनी युवकांसाठी बौद्ध धर्मावर, भन्ते उदितज्ञान थेरो यांनी वर्तमान परिस्थितीत धम्माची आवश्यकता, भन्ते ज्ञानरक्षित थेरो यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म यावर धम्मदेसना दिली. भन्ते धम्मसेन थेरो, भन्ते पुण्ण, भन्ते वेण धम्म चेती यांनी बुद्धधम्माविषयी प्रवचन केले. जगाच्या कल्याणासाठी बुद्ध शासन किती गरजेचे आहे, याबाबत उपासकांना उपदेश करताना भन्ते ज्ञानज्योती महाथेरो म्हणाले, प्रबुद्ध भारत निर्माणासाठी धम्मबांधवांनी एकजुटीने कार्य करावे. बुद्धांनी सांगितलेल्या तत्वानुसार कार्य करावे. बुद्ध, डॉ. बाबासाहेब आणि संविधान संपविण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मतदान यंत्राबाबत बोलताना भंते म्हणाले, सध्या बेकायदेशीरपणे राज्य सुरू आहे. लोककल्याणऐवजी लोकांना धाक दाखवून गुलामीकडे नेण्याचा डाव आखला आहे. लोकशाही मार्गाने नाही तर ठोकशाहीने राज्य करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर केला जात आहे. जगात असे कुठलेच यंत्र नाही, जे हॅक होऊ शकत नाही. मी म्हटले होते बिहारच्या निवडणुका हॅक होतील. परिणाम आपल्यासमोर आहे, असा आरोप भंतेनी केला. मतदान यंत्रावरही सरन्यायाधीशांनी निर्णय द्यायला हवा होता, असेही ते म्हणाले. बोधगया येथील महाविहाराविषयी सांगताना ज्ञानज्योती महाथेरो म्हणाले, राजेंद्र प्रसाद यांनी ते बुद्धिस्टांचे आहे देऊन टाका म्हणून सांगितले. पुढे १९४९ ला बीटीएमसी कायदा ब्राह्मणांच्या हातात गेला आणि विहारावर त्यांनी ताबा मिळवला. त्यासाठी आमची लढाई सुरू आहे आणि तुम्हा सर्वांच्या साथीने यश मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, भीम आर्मी (भारत एकता मिशन), महार रेजिमेंट, बुद्धिस्ट टिचर्स असोसिएशन, कास्ट्राईब संघटना यांच्यासह धम्म उपासकांच्या सहकार्याने ही परिषद यशस्वी झाली.
भूषण गवई त्यांच्या आई वाघीण निघाल्या. त्यांनी डरकाळी फोडली की संघाच्या कार्यक्रमात मी सहभागी व्हावे, हे षडयंत्र आहे म्हणून! असेही भंते म्हणाले.
जगाला शांततीचा संदेश देत तथागत गौतम बुद्धांनी मानवतावादी दृष्टिकोन रूजविला. बुध्दांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी बुलढाणा येथे जागतीक बौद्ध धम्म परिषद आयोजित केली. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या बौध्दबांधवांनी परिषद यशस्वी केली. या परिषदेने बुलडाणा शहर धम्ममय झाल्याची अनुभूती बांधवांना आली.भिक्खू संघटने केलेले प्रवचन,बुध्दांचा दिलेला उपदेश,बुध्दांचे विचार घेऊन धम्मबांधव मोठ्या आनंदाने परतले.



