महात्मा फुले विकास महामंडळातील लाचखोरी.? ८ डिसेंबरपासून आझाद मैदानात लाभार्थी करणार उपोषण.
मुंबई : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळातील कथित लाचखोरी आणि जातीयवादी वर्तनाबद्दल भिमशक्ती सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक झाली आहे. प्रादेशिक व्यवस्थापक शोभा कराड आणि जिल्हा व्यवस्थापक अहमद शेख यांच्यावर गंभीर गैरव्यवहाराचे आरोप करत त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करत निवेदन व्यवस्थापकीय संचालकांकडे सादर करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की मागील पाच-सहा महिन्यांपासून दोन्ही अधिकारी NSKFDC योजनेतील लाभार्थ्यांकडून पाच ते दहा हजार रुपयांची लाच घेऊनच प्रस्ताव पुढे पाठवतात. जे लाभार्थी पैसे देत नाहीत त्यांना कार्यालयात येण्यासही मज्जाव केला जातो. जिल्हा व्यवस्थापक अहमद शेख हे दिवसभर वसुलीच्या कामात व्यस्त राहतात आणि स्थळपाहणीही न करता लाभार्थ्यांना मोबाईलमधील फोटो पाठविण्यास भाग पाडतात, असे आरोप करण्यात आले आहेत.
याचप्रमाणे प्रादेशिक व्यवस्थापक शोभा कराड या मंजुरी पत्रांसाठी लाभार्थ्यांकडून दहा हजार रुपयांपर्यंतची मागणी करतात, पैसे नसलेल्या लाभार्थ्यांशी अरेरावीची भाषा वापरून त्यांना हाकलून लावतात, असा आरोप भीमशक्ती संघटनेने केला आहे. या संदर्भात सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाठ यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली असून त्यांनी व्यवस्थापकीय संचालक एम.डी. बेलदार यांच्याशी या तक्रारींवर बोलल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. मात्र, आजपर्यंत या दोन्ही अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. संघटनेने स्पष्ट चेतावणी दिली आहे की,
“पंधरा दिवसांत निलंबनाची कारवाई न केल्यास शेकडो लाभार्थ्यांसह महामंडळाच्या मुंबई मुख्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले जाईल आणि ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले जाईल.”
उपोषणकर्त्यांमध्ये कविता मारोती गायकवाड आणि चंद्रकलाबाई प्रभाकर मगर यांचा समावेश असून नेतृत्व दिनकरदादा ओंकार, शांतीलाल गायकवाड आणि अनिल साठे उपाध्यक्ष, भिमशक्ती मराठवाडा हे करणार आहेत.
या निवेदनाची प्रत माजी सामाजिक न्याय मंत्री आणि खासदार चंद्रकांत हंडोरे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि आझाद मैदान पोलीस ठाण्याला पाठविण्यात आली आहे.
महामंडळातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सरकार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



