(निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी घडलेली एक घटना माणुसकीलाच काळिमा फासणारी ठरली. मदतीसाठी डोळ्यांत पाणी आणून आर्त हाक मारणाऱ्या पतीला एकही वाहन थांबून मदत करू शकलं नाही. आणि अखेरीस त्या पतीने पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीवर बांधून घरच्या दिशेने प्रवास सुरू केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संपूर्ण प्रदेशात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील अमित भुरा यादव (३५) आणि त्यांची पत्नी ग्यारसी अमित यादव हे दहा वर्षांपासून नागपूर जिल्ह्यातील लोणारा, कोराडी येथे राहत होते. रक्षाबंधनाच्या दिवशी हे दाम्पत्य मोटारसायकलवरून लोणाऱ्यावरून मध्यप्रदेशातील करणपूरकडे निघाले. मोरफाटा परिसरात मागून आलेल्या ट्रकने त्यांना कट दिला. ग्यारसी रस्त्यावर पडल्या आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच प्राण गमावले. ट्रकचालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला.
पत्नीच्या मृत्यूने स्तब्ध झालेला अमित, महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला हात जोडून मदतीची याचना करत होता. पण… कुणाचंही वाहन थांबलं नाही! शेवटी नाईलाजाने अमितने स्वतःच्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधला आणि निघाला. काहींनी नंतर त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला मिळालेल्या दुर्लक्षामुळे आणि भीतीमुळे तो थांबायला तयार नव्हता. अखेर महामार्ग पोलिसांनी त्याला थांबवून मृतदेह ताब्यात घेतला आणि मेयो हॉस्पिटल, नागपूर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक प्रसंगाने मानवी संवेदनांवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पतीची आर्त याचना, मृत पत्नीचा दुचाकीवर बांधलेला देह आणि थंडगार झालेली माणुसकी — हे दृश्य समाजाच्या संवेदनांना चिरून टाकणारं ठरलं आहे.