छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधीनि
ळे प्रतीक न्यूज नेटवर्क –
पूज्यनीय भदंत बोधी पालो महास्थवीर — बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक, विद्वान विचारवंत आणि संघ नेतृत्व करणारे समर्थ भिक्खू — यांनी रविवारी अचानक भीम टेकडी, जटवाडा रोड येथील बुद्ध विहाराला भेट दिली. त्यांच्या या आगमनाने संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि प्रेरणादायी वातावरण पसरले. भीम टेकडी निसर्गरम्य परिसरात वसलेली, जिथे ६५ फूट लांबीची निद्रास्थितीत असलेली भगवान बुद्धांची भव्य मूर्ती स्थापित आहे — हे ठिकाण पाहून महास्थवीर थक्क झाले. त्यांनी या जागेच्या सौंदर्याची आणि धम्मिक वातावरणाची विशेष स्तुती केली. या परिसराचे रूपांतर डोंगराळ, ओसाड भागातून एक पवित्र धम्मस्थळी करण्यामागे आर्याजी धम्मदर्शना महाथेरी यांचे तीन दशकांहून अधिक काळाचे कठोर परिश्रम आणि समर्पण आहे. त्यांच्या कार्याचे भदंत बोधी पालो महाथेरो यांनी मन:पूर्वक कौतुक केले. “निसर्गाच्या कुशीत वसलेली ही भीम टेकडी म्हणजेच खरे नंदनवन आहे. हे कार्य बौद्ध समाजाच्या दानातून घडलेले आहे, आणि हेच खरे संघकार्य आहे,” असे त्यांनी सांगितले. महाथेरो यांच्या भेटीने धम्मदर्शना महाथेरी अत्यंत आनंदित झाल्या. त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “महास्थवीरांचा आशिर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नव्याने बळ देणारे आहे. यामुळे आमच्या कार्यात नवी ऊर्जा संचारली आहे.” महास्थवीर पुढे म्हणाले, “धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना मागेपुढे न पाहता निष्ठेने कार्य करणे, हेच खरे भिक्खूचे कर्तव्य आहे. जे कार्य आर्याजी धम्मदर्शना महाथेरी करत आहेत, ते संपूर्ण संघासाठी प्रेरणादायी आहे.”
या अभूतपूर्व भेटीमुळे बौद्ध अनुयायांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. बौद्ध धम्माच्या पुनरुत्थानासाठी समर्पितपणे झटणाऱ्या कार्यकर्त्यांना भदंत बोधी पालो महास्थवीर यांच्या उपस्थितीने एक नवी दिशा आणि धैर्य मिळाले आहे.