छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) :भारतीय दलित पँथरच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात एकूण २६ ठराव मंजूर करण्यात आले. जनसुरक्षा विधेयक रद्द करणे, अतिक्रमण हटाव मोहिमेत पाडण्यात आलेल्या गोरगरीबांच्या घरांचे पुनर्बांधणी करणे, गायरान जमीन वाटप, दलित शिक्षण, बेरोजगारी असे विविध ठराव यावेळी सर्वानुमते पारित करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारने ठरावांची अंमलबजावणी न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पँथर नेत्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण भुतकर होते. व्यासपीठावर प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. प्रकाशराव सोनवणे, जिल्हाध्यक्ष धम्मपाल दांडगे, ॲड. सिद्धार्थ गवई, सुप्रिया बनसोडे, एजाज खान, सत्तार पटेल, गौतम इंगोले, खंडेराव साळवे, देविदास जाधव, संजय सरोदे, कैलास पवार, वसंत इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्याची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी बोलताना डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणाले, “पँथरने अनेक सामाजिक लढ्यांत मोलाची भूमिका बजावली. मात्र कालांतराने संघटना कमकुवत झाली आणि जातीयवादी शक्तींना संधी मिळाली. आज पुन्हा एकदा अस्मितेचा लढा नव्याने उभारण्याची गरज आहे.”
लक्ष्मण भुतकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “१९७२ साली स्थापन झालेल्या पँथरला तोडण्याचा प्रयत्न झाला. १९९९ मध्ये पुन्हा एकदा संघटना बांधून सामाजिक लढ्यांचा धग कायम ठेवली. आज तथाकथित दलित नेते सत्ताधाऱ्यांच्या संगतीत पैसे घेऊन मोर्चे काढत आहेत, तर दुसरीकडे गरीबांवर बुलडोझर चालवले जात आहेत. यांना आता धडा शिकवायची वेळ आली आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रकाशराव सोनवणे यांनी केले. त्यांनी पँथरच्या लढाऊ परंपरेचा आढावा घेत अनेक प्रश्नांची उकल करत आगामी काळात जातीवादी शक्तींना तोंड देण्यासाठी संघटनात्मक बळ वाढविण्याचे आवाहन केले. त्याचवेळी त्यांनी २६ ठरावांचे वाचन केले, जे उपस्थित कार्यकर्त्यांच्या एकमताने मंजूर करण्यात आले.
या मेळाव्यात गुणवंत विद्यार्थी, महिला बचत गट, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध भीम गायिका कडूबाई खरात, कुणाल वराळे, सरलाताई तायडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील पँथर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये दशरथ कांबळे, समाधान कस्तुरे, गौतम सोनवणे, राजानंद नवतुरे, ॲड. सतीश राऊत, अमोल भुतकर, सुमित्राबाई कासारे, पार्वतीबाई घोरपडे, गीताबाई मस्के, दैवशाली झीने आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अखेरीस ठरावांची अंमलबजावणी न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी घेतला.