छत्रपती संभाजी नगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क ): छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. जि श्रीकांत सर यांच्या संकल्पनेतून शहरातील सर्व धार्मिक स्थळावर निर्माण होणाऱ्या निर्माल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रकिया करण्यासाठी निर्माल्य कलश व निर्माल्य संकलन वाहन याची स्वतंत्र यंत्रणा राबविण्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी यंत्रणेमार्फत प्रथमच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने हा उपक्रम राबविला आहे.
या उपक्रमाचे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन आज गजानन महाराज मंदिर, गारखेडा परिसर येथे मा. आयुक्त श्री. जि श्रीकांत सर व अतिरिक्त आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे मॅडम, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख श्री. नंदकिशोर भोंबे साहेब ,कार्यकारी अभियंता श्री. अमोल कुलकर्णी साहेब, सहायक आयुक्त श्री. राहुल जाधव साहेब व मंदिर समिती सदस्य डॉ. प्रवीण वक्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाले.
गणेशोत्सवात निर्माल्य कलश व संकलन या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादांनंतर हा उपक्रम नियमितपपणे राबविण्याचा निर्णय झालेला आहे.
उपक्रमाचा उद्देश असा आहे की शहरातील प्रमुख मंदिरांतून होणारे फुले, माळा, पत्री, नारळाचे करवंटे इ. निर्माल्य नदी-नाल्यात न टाकता स्वतंत्रपणे संकलित करणे हा मुख्य हेतू आहे तसेच संकलित निर्माल्य प्रक्रिया केंद्रांवर नेऊन सेंद्रिय खत तयार करून पर्यावरणपूरक पद्धतीने त्याचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे शहरातील प्रमुख 25 मंदिरामध्ये “निर्माल्य कलश” ठेवण्याचे नियोजन केलेले आहे. तसेच भविष्यात टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व धार्मिक स्थळांवर कलश ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
प्रथम प्रायोगिक तत्त्वावर शहरातील २५ प्रमुख मंदिरांत कलश ठेवण्यात आलेले आहे. त्यात गजानन महाराज मंदिर, खडकेश्वर महादेव मंदिर, इस्कॉन मंदिर, वरद गणेश, सातारा परिसर खंडोबा मंदिर, एन 1 काळा गणपती मंदिर, तसेच विविध भागांतील गणेश/महादेव/विठ्ठल/दत्त/रेणुका माता मंदिरांसह सुमारे २५ प्रमुख मंदिरांत निर्माल्य कलश ठेवण्याचे मनपाचे नियोजन व अमलबजावणी केलेली आहे. याचबरोबर काही उद्यान व विसर्जन कुंड परिसरातही कलश ठेवून तेथील निर्माल्य गोळा करण्याची तरतूद केलेली आहे. तसेच इतर वेळी धार्मिक कार्यक्रमामधून निर्माण झालेल्या निर्मल्य संकलन सुद्धा यातून करण्यात येणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी हे कलश बसविणे, त्यांचे रोजचे संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया केंद्रावर देणे ही जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे असणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग व यांत्रिकी विभागातर्फे एक स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच निर्माल्य कलश भरल्यावर तो संकलित करण्यासाठी QR कोड देऊन त्यावरून माहिती दिल्यास संकलन केले जाणार आहे. तसेच भविष्यात शहरातील प्रमुख भागांसाठी स्वातंत्र्य 3 ते 4 वाहनांचे नियोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात जशी प्लास्टिक निर्मित विशेष कलशांची प्रयोगशीर मांडणी करून निर्माल्य खतासाठी पाठवले गेले त्याच पद्धतीने वर्षभर प्रमुख मंदिरांसाठी वापरण्याचे नियोजन मनपाने केलेले आहे. तसेच जमा झालेले निर्माल्य वर प्रक्रिया करण्यासाठी NGO सोबत करार करून यावर प्रकिया करून तयार होणार्या वेगवेगळ्या गोष्टींची विक्री करण्यात येणार आहे किंवा शहरातील मंदिरांना देण्यात येणार आहे असे उपायुक्त श्री. नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे मॅडम, उपायुक्त नंदकिशोर भोंबे साहेब, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी साहेब, सहायक आयुक्त राहुल जाधव साहेब, स्वच्छता अधिकारी अनिल जाधव, मंदिर समिती अध्यक्ष प्रवीण वक्ते, मंदिर व्यवस्थापक गजानन बन, स्वच्छता निरीक्षक ओम बडे, विशाल खरात, शहर समन्वयक किरण जाधव, चेतन वाघ, अजय मुथा, प्रतिक साळवे, तसेच झोन कार्यालय सातचे स्वच्छता जवान, स्वच्छता कर्मचारी यांची उपस्थिती होती.



