छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूस नेटवर्क)
:शहरातील वाढत्या अवैध पार्किंग, वाहतूककोंडी आणि नागरिकांच्या सातत्याने वाढत असलेल्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आक्रमक पवित्रा घेणार आहे. गेल्या दोन वर्षांत रस्त्यावर अनधिकृत वाहन पार्किंग व गाड्या उचलून अवैध रक्कम वसुलीच्या तक्रारीत मोठी वाढ झाली होती.
या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेने विशेष वाहन आणि पथक तयार केले असून त्यामध्ये दोन माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाला शहरातील कुठेही अवैधरित्या उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
कारवाईदरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग व फोटो पुरावे अनिवार्य असतील आणि त्यानुसारच महानगरपालिका थेट दंड ठोठावणार आहे.
महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की,
पार्किंगसाठी इमारत परवानगीमध्ये जागा असतानाही अनेक ठिकाणी वाहन रस्त्यावर पार्क केली जातात. यामुळे वाहतूककोंडी व अपघातांचा धोका वाढतो. आता या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल.”
याचबरोबर शहरातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत महानगरपालिका खड्डेमुक्त छत्रपती संभाजीनगर बनवण्याच्या मोठ्या मोहिमेला सुरुवात करत आहे. आतापर्यंत खड्डे भरण्याचे काम हाताने केल्याने ते टिकाऊ राहत नव्हते, परंतु आता आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे टोल-पॅचिंग करून मजबूत व टिकाऊ दुरुस्ती करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या या उपक्रमांमुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्यास, अवैध पार्किंग कमी करण्यास आणि शहरातील रस्ते अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मोठी मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. नागरिकांनीही या उपक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



