छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) –कॉलेज तरुणांना लक्ष्य करणाऱ्या ड्रग माफियाच्या विळख्यातील एक मोठा गुंता मुकुंदवाडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पुण्यात शिक्षण घेणाऱ्या एका 21 वर्षीय अभियंता विद्यार्थ्याच्या कॉलेज बॅगेतून तब्बल 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी संशयावरून तपासणी केली असता बॅगेतून मोठ्या प्रमाणावर गांजा बाहेर आला आणि किशोर गणेश सांगळे (रा. देऊळगाव राजा, बुलढाणा) हा विद्यार्थी ताब्यात घेतला. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.प्राथमिक चौकशीत उघड झाले की, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मुलाला “फक्त बॅग पोहोचवायची” एवढ्या कामासाठी ५ हजार रुपये देण्याचा आमिष दाखवण्यात आला आणि तो न कळत ड्रग तस्करीच्या अंधाऱ्या जाळ्यात ओढला गेला.
सिंहगड परिसरातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या या तरुणाला त्याच्याच काही मित्रांनी या रॅकेटमध्ये पाय घालायला भाग पाडल्याचे माहिती पोलिस तपासात पुढे आले आहे.तरुणांचे शिक्षण, स्वप्ने आणि भविष्य खेचून घेणाऱ्या ड्रग माफियाच्या या रॅकेटवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केलेली धडक कारवाई निश्चितच धक्कादायक आणि जागरूक करणारी आहे.



