नांदेड / प्रतिनिधी : प्रेमाला जातीची साखळी घालताना एका तरुणाचा जीव घेतला गेला.
आणि आपल्या प्रियकराच्या पार्थिवाशी लग्न करत एका मुलीनं संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय विदीर्ण करून टाकलं. सक्षम ताटे (वय २५) याची केवळ ‘तो बौद्ध जातीचा होता’ म्हणून त्याची गोळ्या घालून, दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. आणि सक्षमच्या मृतदेहाजवळ उभी असणारी आंचल मामीडवार (वय २१), डोळ्यांतून आसवे आणि ओठांवर फक्त एकच वाक्य“माझ्या प्रेमाला गोळी लागली, पण मी जिंकले आहे, माझा नवरा सक्षमच!”
जातीच्या नावाखाली प्रेमाची हत्या
आंचल आणि सक्षम एकमेकांवर मनापासून प्रेम करत होते. पण आंचलचे वडील गणेश मामीडवार व भाऊ हिमेश, यांच्या डोळ्यांवर जातिभेदाची काळी पट्टी बांधलेली.
त्यांनी प्रेम समजून घेण्याऐवजी आपल्या मुलीचे आयुष्य संपवायचा मार्ग निवडला. गुरुवार रात्री जुन्या गंज भागात सक्षमला अडवून गोळ्या झाडल्या, तो कोसळताच दगडांनी ठेचून टाकलं. एक तरुण, त्याच्या आई वडिलांचे एक स्वप्न, एक आयुष्य क्षणात मातीमोल झाले!
पार्थिवाशी हळद-कुंकु लावून लग्न, आंचलचा तडफडता आवाज
शुक्रवारी अंत्यसंस्कारापूर्वी आंचल सक्षमच्या पार्थिवाजवळ उभी होती. हातात हळद-कुंकू, डोळ्यांत वेदना, आणि आवाजात जिद्द. तिचा आक्रोश
“तुम्ही माझ्या जिवंत प्रेमाला मारलं,
पण माझा सक्षम मरूनही माझाच आहे. मी सदैव त्याचीच पत्नी आहे. त्याचा खून करणाऱ्या माझ्या बापाला आणि भावाला फाशी द्या, त्यांनी माझं सर्वस्व मारलं!” हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
एका मुलीचं आयुष्य जिवंतपणी उद्ध्वस्त झालं होतं,एका प्रेमकथेचा शेवट मृतदेहाशेजारीच लिहिला गेला.
पोलिसांची धडक कारवाई
या अमानुष खुनात सहभागी असलेल्या आंचलचे वडील, भाऊ आणि साथीदारांना पोलिसांनी रातोरात ताब्यात घेतलं. गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.
एक प्रश्न मात्र अजूनही हवेत…
आजही प्रेमाला जात विचारली जाते?
आजही मुलीच्या आयुष्यापेक्षा आपली जात मोठी आहे? आजही एक सक्षम मेंल्यावरच समाजाला भान येणार आहे का?
जातीयभेद आणि तिरस्कार जीव घेण्यापर्यंतची कृरता कधी थांबणार आहे की नाही. हा प्रश्न या घटनेमुळे उभा राहतो.



