मालवण :- भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ज्या ज्या वेळी जिह्यात येतात, तेव्हा वेगळं वातावरण करतात. मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी २५ लाख रुपये मिळाल्यावरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केला आहे.
काल रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले ते सहज आले नव्हते, त्यांच्यावर माझा संशय होता. मालवणमध्ये ६ ते ७ घर आहेत तिथे रोज पैशांच्या बॅग येतात. भाजपचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात. पैसे वाटून निवडून आल्यानंतर ते नगरसेवक काम करणार का? ते वसुलीच्या कामाला लागतील अशी टीका निलेश राणे यांनी केलीय.
बाहेरुन आलेल्या लोकांनी ही संस्कृती आणली आहे, असा आरोप देखील आमदार निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर केला. रवींद्र चव्हाण येतात, गडबड करतात, त्यांना जिरवा जिरवी करायची असते. रवींद्र चव्हाण यांनी विकासाचा अजेंडा कुठे दाखवला. आता २४ तास यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे. आम्ही पकडलं तर जागच्या जागी बंदोबस्त करु असेही निलेश राणे म्हणाले. पैसे वाटून नगरसेवक झाले तर ते भ्रष्टाचार करणार. त्यातून ते घर चालवणार, कसला विकास करणार? असा सवाल देखील निलेश राणे यांनी केलाय.
मालवणमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी २५ लाख रुपयांची रोकड सापडली आहे. विजय किंजवडेकर असं त्यांच नाव आहे. त्यांच्या घरी हे पैसे काय करतात, हे सगळं निवडणूक यंत्रणेला सांगावे लागेल असे निलेश राणे म्हणाले. काल रवींद्र चव्हाण मालवण मध्ये येऊन गेले, कालपासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे असे म्हणत राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले. पैसे वाटप करुन निवडणूक लढवायची पद्धत आहे का?. मैदानात येऊन लढा. त्या घरात अजून पैशाच्या बॅग आहेत. त्या शोधून योग्य ती कारवाई करावी. २५ ते ५० लाख रुपये भरून ठेवलेली मालवण मध्ये ८ ते १० घर असल्याचा निलेश राणेंनी आरोप केला आहे.



