परभणी l प्रतिनिधी संजय बगाटे
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वतःप्रत अर्पण केलेल्या भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने विविध संघटनाच्या वतीने आज शहरात संविधान रैली,संविधान प्रति वाटप व सामुहीक उद्देशिकेचे वाचन करून संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी ११ वाजता संविधान साक्षरता अभियानाच्या व अनेक संघटनांच्या समन्वयातून महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत रैली काढण्यात आली. यात समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, भीमशक्ती सह नागरिक सहभागी झाले होते.
समता सैनिक दलाने संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. या वेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी संविधान प्रतिकृती शिल्प हार अर्पण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की अत्यंत अभ्यासपूर्ण विद्वत्तेचे धनी असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्तम असे संविधान लिहिले आहे. हे संविधान चिरकाल टिकणार आहे.याचे संवर्धन करणे हे भारतातील १४० कोटी जनतेचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले.या कार्यक्रमातील संविधान उद्देशिकेचे वाचन समता सैनिक दल जवान कबीर उजगरे या विद्यार्थ्याने केले. या कार्यक्रमासाठी प्रा डॉ प्रवीण कनकुटे,गोपीनाथ कांबळे, पप्पूराज शेळके, डी वाय खेडकर, सुनील पवार सुनील कोकरे,भूषण मोरे,सतीश भिसे, बबनराव वाहूळे,यांनी पुढाकार घेतला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते संविधानाच्या संक्षिप्त रूपात असलेल्या प्रति वाटप करण्यात आल्या. या वेळी आशिष वाकोडे,डॉ भारत नांदूरे,राहुल घनसावंत नितीन सावंत सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दुसरी संविधान रैली सत्काय फाउंडेशनच्या वतीने दुपारी तीन वाजता शनिवार बाजार ते शहराच्या मध्यवस्तीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर पर्यंत काढण्यात आली. यात संविधानाचा देखावा साकारण्यात आला होता.
संविधान दिनाच्या निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध संघटनांनी अभिवादन केले.



