आम्ही भीमा कोरेगावची औलाद आहोत”भीमराव आंबेडकर यांचे प्रतीपादन.
- मुंबई | शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य संविधान सन्मान महासभेत भीमराव आंबेडकर यांनी देशातील संविधानिक मूल्यांवर होत असलेल्या संभाव्य आघातांवर जोरदार शब्दांत टीका केली. सभेला उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “२०१४ मध्ये देशात सत्तांतर झाल्यापासून संविधान धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संविधानावर कुणीही हात घातला, तर आंबेडकरवादी आक्रमकपणे रस्त्यावर उतरतील. आम्ही संख्या बघत नाही, आमच्या समोर कोण आहे हेही बघत नाही. कारण आम्ही भीमा कोरेगावची औलाद आहोत.”
आंबेडकर यांनी आपल्या भाषणात संविधानाची मूलभूत तत्त्वे, सामाजिक न्यायाची भूमिका आणि सर्व धर्मीयांच्या अधिकारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, संविधान हेच देशातील सर्व धर्म, पंथ, जाती आणि समुदायांचे समान संरक्षक आहे. “आज सर्व धर्मातील लोकांचे हक्क व स्वातंत्र्य संविधानामुळेच शाबूत आहेत. त्यामुळे संविधानावर केंद्रित होणाऱ्या प्रत्येक निर्णयाबद्दल समाजाने सजग राहिले पाहिजे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी सर्व समुदाय, विचारसरणी आणि स्तरातील नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. “संविधान वाचवणे ही आज फक्त एका समाजाची लढाई नाही; तर प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. हा दस्तऐवज टिकला तरच लोकशाही टिकेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सभेमध्ये देशभरातून आलेल्या हजारो नागरिकांनी संविधान वाचवण्याचा आणि सामाजिक सौहार्द जपण्याचा संकल्प व्यक्त केला. वातावरणात जय भीम, संविधान जिंदाबाद या घोषणा घुमत होत्या.
शिवाजी पार्कातील ही महासभा आंबेडकरवादी चळवळीच्या पुढील रणनीतीचा महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे निरीक्षकांचे मत आहे.



