६ डिसेंबरला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची मुख्यमंत्रीांकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी), २४ नोव्हेंबर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा प्रमुख दिनेश गवळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधान निर्मितीमध्ये डॉ. आंबेडकरांचे योगदान अद्वितीय असून त्यांचे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्य महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. राज्यातील आणि देशभरातील लाखो अनुयायी ६ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी तसेच देशातील विविध स्मारकांवर महापुरुषाला वंदन करण्यासाठी जातात.
सामान्य प्रशासन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांसाठी ६ डिसेंबर हा स्थानिक सुट्टीचा दिवस जाहीर केला असला तरी, राज्यातील सर्व अनुयायांना कोणताही अडथळा न येता प्रवास करून आदरांजली वाहता यावी, या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी घोषित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अशी सुट्टी जाहीर केल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेवरील ताणही कमी होईल, असे गवळे यांनी नमूद केले.
निवेदन देताना पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, जेष्ठ नेते प्रकाश घोरपडे, जिल्हा महासचिव राजकुमार अमोलिक, नेते हनु नाना, पूर्व शहराध्यक्ष बाबर खान आदी उपस्थित होते.



