“महानगरपालिकेचा निष्काळजीपणा : पाईप फुटून लाखो लिटर पाणी वाया, नागरिक संतप्त!”
निळे प्रतीक न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर :
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे शहरात पुन्हा एकदा पाण्याची प्रचंड नासाडी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मयूर पार्क एसबीओ समोर, आई हॉस्पिटलच्या कॉर्नरजवळ जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी अक्षरशः वाहून जात आहे.
स्थानिक नागरिकांनी ही गंभीर बाब लक्षात येताच महानगरपालिका अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वारंवार कळवूनही कोणत्याही तातडीच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. फुटलेल्या पाईपमधून सलग वाहणारे पाणी पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की,
“पाणीटंचाईने त्रस्त शहरातील प्रत्येक थेंब मौल्यवान आहे. अशा स्थितीत महानगरपालिका स्वतःच पाणी वाया घालवत असेल तर नागरिकांना काय दोष द्यायचा? अधिकारी म्हणतात हो कळलं, काम करतो’ एवढ्यावरच थांबतात, पण प्रत्यक्षात काम शून्य आहे.”
महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून अशा प्रकारची निष्क्रियता ही निंदनीय आणि जनतेचा अपमान करणारी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शहराच्या जलव्यवस्थापनातील त्रुटी, ढिलाई आणि जबाबदारीचा अभाव यावर नागरिकांनी जोरदार ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान, माननीय आयुक्तांनी तात्काळ हस्तक्षेप करून फुटलेल्या पाईपची दुरुस्ती करण्यासाठी आदेश द्यावेत, तसेच वारंवार तक्रारी करूनही हालचाल न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे.
शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लाखो लिटर पाणी वाया जाणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने दुर्लक्ष न करता तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.



