टेंभुर्णीत हॉटेल मॅनेजरला निर्वस्त्र करून मारहाण मालक पोलिसांच्या ताब्यात.
सोलापूर | प्रतिनिधी
माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे घडलेल्या अमानुष प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध हॉटेल 77 77 मध्ये हॉटेल मालक लखन माने यांनी आपल्या मॅनेजरला सर्वांसमोर निर्वस्त्र करून पाईपने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेवरील गंभीर प्रश्नचिन्हे उपस्थित झाली होती. मात्र महाराष्ट्र टाइम्च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपी मालकाला अटक केली.
ही घटना प्रत्यक्षात तीन महिन्यांपूर्वी घडलेली असून, मालकाच्या दहशतीमुळे पीडित निवासी नखाते हे आजही त्याच हॉटेलमध्ये काम करत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काय घडलं होतं?
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलमध्ये लखन माने यांनी मॅनेजरला काम सोडून जाऊ नये म्हणून दबाव टाकत सर्वांसमोर कपडे काढून पाईपने मारहाण केली. एवढंच नाही तर, त्याच्या खिशातील पैसेसुद्धा काढून घेतल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी माने यांनी फेसबुकवरून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या चौकशीत वस्तुस्थिती समोर आली.
पोलिसांची कारवाई
टेंभुर्णी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले की,
- दहशत माजवणे
- खंडणी
- जीवे मारण्याचा प्रयत्न
- बेकायदेशीर बंदी
आदी आठ गंभीर कलमांखाली लखन माने यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी पुढील काळात या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.



