छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी दि.३१
शहर व जिल्ह्यात अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली पावसाळ्यात सुरू असलेल्या बेघर नागरिकांवरील बुलडोजरशाही विरोधात आता जनतेचा आक्रोश रस्त्यावर उतरतोय. कोणतेही पुनर्वसन न देता दलित, वंचित, बहुजन, गोरगरीब व कष्टकरी वर्गाची घरं उद्ध्वस्त करण्याच्या निषेधार्थ ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता ‘जन आक्रोश महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ३१ जुलै रोजी शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय आंबेडकरवादी, संविधानवादी, मानवतावादी व समतावादी संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महामोर्चाचे आयोजन जाहीर करत एकमुखी ठराव करण्यात आला.
शहरातील फुलेनगर, नागसेनगर, मिलिंदनगर, हर्सूल, मुकुंदवाडी, संजयनगर, कंचनवाडी, नक्षत्रवाडी, पढेगाव, मिठमिठा, नारेगाव, कबीरनगर, त्रिशरणनगर, कैलासनगर, दादा कॉलनी, शाहबाजार अशा अनेक वसाहतींना कारवाईची नोटीस बजावण्यात आली असून, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे, कमानी, विहारे, मंदिर-मशिदींसारखी ठिकाणेही बुलडोजरच्या निशाण्यावर आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.
हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी जनतेला निवडणुकीपुरतं लक्षात ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता मात्र पाठ फिरवली आहे, अशी खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
महामोर्चाची सुरुवात क्रांती चौकातून अभिवादनाने होणार असून, पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक, किल्ला अर्क मार्गे हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक देणार आहे. तेथे विविध मागण्यांचे निवेदन सादर करून या आंदोलनाची सांगता होईल.
या आंदोलनासाठी शहर व जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येत यलगार पुकारला आहे. सर्व आंबेडकरवादी, संविधानवादी, समतावादी, मानवतावादी संघटनांनी आणि जागरूक जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी दिपक निकाळजे, राजू साबळे, अरविंद कांबळे, अमित वाहुळ, जयश्री शिरके, सुनिल सोनवणे, जयेश अभंग, प्रांतोष वाघमारे, विजय बचके, मनोज जाधव, मिलिंद बनसोडे, वसंतराज वक्ते, बलराज दाभाडे, सिध्दोधन मोरे, किरण छुपे, राहुल मकासरे, अमोल दांडगे, सचिन शिंगाडे, संतोष चव्हाण, असलम हुसेन, किशोर दामोधर, प्रेमलता चंदन, इंदुमती धमेले, सरस्वती गवारे, अंक्षता दाभाडे, अंजली शिर्के आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.