27.3 C
New York
Monday, August 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

“जादूटोणा कायदा कागदावरच राहिला; फडणवीस सरकारने प्रचारच रोखला” — प्रा. श्याम मानवांचा घणाघात

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी“राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. उलट तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने या कायद्याचा प्रचार-प्रसारच रोखला. त्यामुळेच अशोक खरातसारखे तथाकथित ‘बाबा’ फोफावले,” असा थेट आणि गंभीर आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी केला.

शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. मानव यांनी सरकार, पोलिस यंत्रणा आणि भोंदूबाबांच्या साखळीवर जोरदार टीका केली. “अनेक प्रकरणांत पोलिसांवर दबाव आणला गेला. त्यामुळे एफआयआर दाखलच होत नव्हते. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बाबांना राजकीय संरक्षण मिळाल्याने समाजात भीती, फसवणूक आणि अज्ञान वाढले,” असा आरोप त्यांनी केला.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यभर “बुवाबाजी विरोधी अभियान” राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत १४ जिल्ह्यांत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी प्रा. मानव बुधवारी छत्रपती संभाजीनगरात आले होते.

यावेळी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. पी. वाय. कुलकर्णी, प्राचार्या डॉ. रेखा शेळके, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, जिल्हा संघटक पंकज देशमुख, सचिव राजकुमार कांबळे, रावसाहेब जारे, अनिल गवळे, सौरभ औटे आदी उपस्थित होते.

“प्रत्येक चमत्काराचा दावा म्हणजे लोकांची फसवणूक”

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक स्पष्ट करताना प्रा. मानव म्हणाले, “संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम किंवा संत गाडगे बाबा यांनी चमत्कार केल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा आव आणून लोकांना प्रभावित करणारा प्रत्येक बाबा हा भोंदूच असतो.”

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या तथाकथित ‘दिव्य दरबारां’वरही त्यांनी सडकून टीका केली. “लोकांची नावे, आजार, वैयक्तिक माहिती दैवी शक्तीने सांगण्याचे दावे हे थेट जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन आहे,” असे ते म्हणाले.

“रुपाली चाकणकरांवरही गुन्हा दाखल व्हावा”

“जादूटोणा विरोधी कायद्यानुसार अशा कृत्यांना सहाय्य करणे हेदेखील गुन्हाच आहे. त्यामुळे सहाय्यकारी भूमिका घेणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी मागणीही प्रा. मानव यांनी केली.

आज एमजीएममध्ये व्याख्यान

“बुवा तेथे बाया : खरातसारख्या बाबांना महिला का फसतात?” या विषयावर प्रा. श्याम मानव यांचे व्याख्यान गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी लेखक प्रा. जयदेव डोळे राहणार आहेत. आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!