spot_img
spot_img
spot_img
spot_img

रमाई मासिक : फुले-आंबेडकरी चळवळीचा जिवंत दस्तऐवज, भास्कर भोजने

रमाई मासिकाचा १६ वा वर्धापनदिन व भारतीय स्त्रीमुक्ती दिन उत्साहात साजरा
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी —
रमाई मासिकाच्या माध्यमातून डॉ. रेखा मेश्राम यांनी वंचित-बहुजन समाजातील महिलांना लेखन, विचार मांडणी आणि अभिव्यक्तीसाठी दिलेली संधी ही फुले-आंबेडकरी चळवळीला बळ देणारी आहे. रमाई मासिक हा केवळ नियतकालिक नसून फुले-आंबेडकरी चळवळीचा महत्त्वाचा दस्तऐवज असून तो जतन करण्याची जबाबदारी प्रत्येक फुले-आंबेडकरवाद्याची आहे, असे प्रतिपादन फुले-आंबेडकर विद्वत सभेचे भास्कर भोजने (अकोला) यांनी केले.
ते मराठवाडा साहित्य परिषद, रॉक्सी टॉकीजजवळील पैठणगेट येथे आयोजित रमाई मासिकाच्या १६ व्या वर्धापनदिन व भारतीय स्त्रीमुक्ती दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. अनेक माध्यमे उभी राहतात, मात्र दीर्घकाळ टिकत नाहीत. रमाई मासिकाचा चळवळीतील अनेक वृत्तपत्रांप्रमाणे इतिहास होऊ देऊ नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय मून होते. प्रमुख वक्ते म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या ॲड. वैशाली डोळस व बौद्ध विचारवंत डॉ. भगवान धांडे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. अरुणा लोखंडे, सत्यशोधक समाजाचे ॲड. के. ई. हरिदास, बौद्ध साहित्यिक डॉ. धनराज गोंडाणे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कोमल हिवाळे, शहराध्यक्ष वंदना जाधव व साधना पठारे यांचा समावेश होता.
प्रास्ताविकात रमाई फाऊंडेशनच्या प्रा. रेखा मेश्राम (संपादक, रमाई मासिक) यांनी गेल्या १६ वर्षांपासून रमाई मासिक अविरतपणे सुरू असून विविध उपक्रमांद्वारे फुले-आंबेडकरी विचारधारा रुजविण्याचे कार्य सातत्याने केले जात असल्याचे सांगितले. रमाई स्मृती दिनानिमित्त दरवर्षी रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन महाराष्ट्रभर आयोजित केले जाते. समताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी रमाई फाऊंडेशन व रमाई मासिक भविष्यातही अविरत कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या वाचनाने झाली. हे वाचन डॉ. वंदना पाटील यांनी केले. रत्नकला बनसोडे यांनी कविता सादर केली. राजस्थानमधील जयपूर उच्च न्यायालयातील मनूच्या पुतळ्याला काळे फासल्याबद्दल कांता अहिरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका शकुंतला धांडे व लढाऊ कार्यकर्त्या रेखा उजगरे यांचाही गौरव करण्यात आला.
ॲड. वैशाली डोळस यांनी माध्यमांची मुस्कटदाबी होत असताना रमाई मासिक १६ वर्षांपासून निर्भीडपणे सुरू असल्याचे सांगितले. विचारधारेतील घुसळण थांबविण्याची गरज असून भाजपा व काँग्रेसमध्ये राहून स्वतःला कट्टर आंबेडकरवादी म्हणवणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने ‘आंबेडकरवादी म्हणजे कोण?’ याची नव्याने मांडणी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली; मात्र ती आज खरोखर नष्ट झाली आहे का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सूत्रसंचालन दैवशीला गवंदे यांनी केले तर आभार ललिता खडसे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. यशवंत खडसे, ॲड. जयश्री भगत, राजन किर्तने, कांचन गादेकर, सी. पी. पाटील, रतनकुमार साळवे, मनोरमा बनसोडे, सविता अभ्यंकर, धम्मप्रिया खरात, संगीता अंभोरे, मंगल निकाळजे, मंगल मुन, गंगाबाई सुरडकर, मधुकर गवंदे, शैलेंद्र मिसाळ, प्रयाग म्हस्के, भीमराव गाडेकर, अनंत भवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Epaper Website

Related Articles

प्रभादेवीत जातीय द्वेषातून १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

प्रभादेवीत जातीय द्वेषातून १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर २४ तासांत आरोपी गजाआड मुंबई | प्रतिनिधी प्रभादेवी परिसरात जातीय मानसिकतेतून एका १९ वर्षीय...

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी वादळ : गिरीश महाजनांच्या भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख नाही; महिला अधिकाऱ्याचा थेट सवाल, व्हिडिओ व्हायरल

प्रतिनिधी | नाशिक नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात राज्याचे मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांच्या भाषणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!