संगमनेर, अहिल्यानगर | प्रतिनिधी
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी संगमनेरला आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘फोनवर कामे मंजूर’ शैलीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मिश्किल भाषेत जोरदार हल्ला चढवला.
अमोल खताळ यांच्या पॅनेलच्या प्रचारसभेत बोलताना शिंदेंनी नागरिकांच्या मागण्यांवरून मंत्री उदय सामंत व प्रकाश आबिटकर यांना थेट फोन लावून ‘कामे एका फोनवर’ अशी छाप पाडण्याचा प्रयत्न केला. यावर थोरातांनी निवडणुकीतील हा प्रकार ‘स्टंटबाजी’ असल्याची टीका केली.
थोरातांचा चिमटा : “धरण मंजूर, नदी मंजूर, डोंगरही मंजूर!”
थोरात म्हणाले—“निवडणुकीत बनवाबनवी करावी लागते, पण मर्यादा असतात. संगमनेरमध्ये शिंदे आले आणि नागरिक काही मागतात तर ते म्हणतात—धरण मंजूर! लोक विचारतात धरण कसं? ते म्हणतात—नदी मंजूर! पुन्हा लोक विचारतात नदी कुठून? ते म्हणतात—डोंगर मंजूर! ही कोणती काम करण्याची पद्धत?”या वक्तव्यावर सभेत हास्याची लाट उसळली.
“संगमनेरमध्ये काम करायचे असेल तर सत्यजीत तांबेच पुढे येईल”
शिवसेनेवर अधिक टीका करत थोरात म्हणाले—“आमदारकी–खासदारकी असताना एक रस्ता नीट झाला नाही. विकासाच्या गप्पा मारायच्या असतील, तर आधी नगर–मनमाड रस्ता तरी करून दाखवा.”यासोबत त्यांनी ठाकरे गटाचे नेते सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देत म्हटले—संगमनेरमध्ये खरं काम करायचं असेल, तर सत्यजीत तांबेच करेल. इतरांना टोल नाक्यांच्या वसुलीतूनच वेळ मिळत नाही.”
शिंदेंची ‘फोन स्टाईल’ सोशल मीडियात चर्चेत
शिंदे यांनी एमआयडीसी, रुग्णालय दुरुस्ती, स्थानिक विकास कामांसाठी सभेतूनच मंत्र्यांना फोन करून त्वरित निर्णय घेतल्याचा आव आणला. याच प्रकाराला थोरातांनी ‘निवडणुकीतील स्टंट’ असे म्हणत शिंदेंना लक्ष्य केले.संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीला रंग चढू लागला असताना शिंदे–थोरात यांच्यातील हा शब्दप्रहार जोरदार रंगला आहे. शिंदेंची ‘फोनवरील मंजुरी शैली’ आणि थोरातांची मिश्किल टीका हे आता संगमनेरच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चिले जाणारे मुद्दे ठरत आहेत.



