जळगाव /प्रतिनिधी:
निलेश राणे स्टिंग प्रकरणावर विचारल्यावर मौन, दोन तारखेनंतरच्या संकेतांमुळे राजकीय चर्चांना ऊत:
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. विविध बैठका व कार्यकर्त्यांशी संवाद आटोपल्यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला.यावेळी पत्रकारांनी त्यांना निलेश राणे यांच्या कथित स्टिंग ऑपरेशन संदर्भात प्रश्न विचारला असता चव्हाण यांनी नेहमीपेक्षा वेगळा प्रतिसाद दिला. स्टिंग प्रकरणावर थेट उत्तर देण्याचे टाळत त्यांनी “सध्या आम्हाला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे” एवढेच उद्गार काढले आणि तातडीने पुढे निघून गेले.
मात्र त्यांच्या या वाक्यानेच राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलाच ऊत आला आहे.
“दोन तारखेपर्यंत युती टिकवायची…मग दोन तारखेनंतर काय?” — या प्रश्नावरून विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.भाजपमध्ये काही मोठे निर्णय होणार आहेत का? स्टिंग प्रकरणाचा काही आतल्या घडामोडींशी संबंध आहे का? की नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षात मोठे फेरबदल होणार आहेत? अशा विविध चर्चांनी परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, निलेश राणे यांच्या स्टिंग व्हिडिओवर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत असून, त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांनी उत्तर न देण्यामागे नेमकी काय भूमिका आहे, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.भाजपच्या अंतर्गत हालचालींचे पडसाद आगामी काही दिवसांत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



