एक भारत, श्रेष्ठ भारत! महाराष्ट्र हिंदी विद्यालयात संविधान दिनाचा सन्मान सोहळा!
छत्रपती संभाजीनगर :
शहागंज येथील महाराष्ट्र हिंदी विद्यालयात संविधान दिन उत्साहपूर्ण आणि दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक पठण करून झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र तायडे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महावितरण मराठवाडा विभागाचे मुख्य अभियंता तथा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे पवनकुमार कछोट उपस्थित होते. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक किरण पवार,पर्यवेक्षक योगेश्वर निकम, शिक्षक प्रतिनिधी समाधान देशमुख, समन्वयक साहेबराव पाटील व विठ्ठल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. अतिथी परिचय शिक्षक अजय चव्हाण यांनी करून दिला.सोनाक्षी नाडे, मीना कुमावत, अलमास शेख, आदिल बेग, जोया खान, सायली नाडे, अलिझा शेख आणि ऋत्विक कुशवाह या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीतील असामान्य योगदानावर भाषणे सादर करत उपस्थितांचे मन जिंकले.प्रमुख भाषणात पवनकुमार कछोट यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, त्यातील मूलभूत अधिकार, मूल्ये आणि नागरिकांची कर्तव्ये यावर भाष्य केले. संघर्षमय प्रवासातील अनुभव उलगडत त्यांनी “शिक्षण हीच खरी ताकद असून या देशातील विद्यार्थी सर्वप्रथम चांगला माणूस झाला पाहिजे,” असे त्यांनी प्रतिपादन केले.अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक रवींद्र तायडे म्हणाले, “भारतीय राज्यघटना ही केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशातील प्रत्येक नागरिकाच्या स्वाभिमानाचे,अस्मितेचे, अधिकारांचे आणि स्वातंत्र्याचा संरक्षक दस्तऐवज आहे.” तसेच त्यांनी “एक भारत, श्रेष्ठ भारत”, “मतदान करा, देश घडवा”, “स्वातंत्र्याची शान – संविधान महान” अशा प्रभावी घोषणा देत संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.या प्रसंगी सादर केलेले “स्वातंत्र्याचा ध्वज तिरंगा सदैव फडकत राहील का?” हे प्रेरणादायी गीत विशेष दाद मिळवून गेले. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन संदीप भदाणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावी (क) मधील कु.सुमैय्या खान यांनी केले. आभार प्रदर्शन दहावी (अ) मधील कु.सोनाक्षी नाडे यांनी मानले. आयोजनास साहेबराव पाटील व विठ्ठल राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
–



