छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वच्छतेसाठी मोठे पाऊल : 100 नवीन पे-अॅण्ड-यूज शौचालयांच्या उभारणीला मंजुरी
छत्रपती संभाजीनगर – शहरातील स्वच्छता सुविधा मजबूत करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात 100 नवीन पे-अॅण्ड-यूज शौचालये उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुलभ शौचालय सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठक माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली. दूरदृश्य प्रणालीद्वारे महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब बेलदार, सामाजिक न्याय विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शहरातील बाजारपेठा, बसस्थानके, सार्वजनिक जागा आणि दाट वस्तीच्या परिसरात वाढत्या लोकसंख्येनुसार शौचालयांची वाढती गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शौचालयांसाठी जागा महानगरपालिका उपलब्ध करून देणार असून निधी राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळामार्फत दिला जाणार आहे.
प्रत्येक शौचालयात –
- महिला, पुरुष आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र सुविधा
- स्वच्छ पाण्याची उपलब्धता
- विद्युत व्यवस्था
- सुरक्षा व्यवस्था
- नियमित साफसफाई
या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.
हा संपूर्ण प्रकल्प प्री-फॅब्रिकेटेड / मॉड्यूलर तंत्रज्ञानावर आधारित असून, छत्रपती संभाजीनगर शहराच्या स्वच्छतेकडे आणि सार्वजनिक आरोग्याकडे नेणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.



