नांदेड : नांदेडच्या राजकारणात मोठी हालचाल झाली असून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे लोहा तालुका मंडळ अध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
शरद पवार हे आतापर्यंत भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामुळे भाजपला आणि विशेषतः चव्हाण गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे स्थानिक राजकारणात बोलले जात आहे.
आगामी लोहा नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पवार यांची लोहा तालुक्यातील मजबूत पकड आणि संघटन कौशल्यामुळे अजित पवार गटाला मोठा फायदा होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
शरद पवार यांच्या पाठीमागे स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा जनसमुदाय आहे. त्यामुळे आता या पक्षांतराचा भाजपच्या स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



