मिरा भाईंदरमध्ये राजकीय वारे बदलले!
अजित पवार गट व भाजपला धक्का – इमरान हाशमी, आनंद सिंग आणि स्वप्नाली म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश
मिरा भाईंदर :
मिरा भाईंदरच्या राजकारणात आज मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे. अजित पवार गटाचे प्रभावशाली नेते इमरान हाशमी आणि आनंद सिंग तसेच भाजपच्या स्वप्नाली म्हात्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला आहे.
या भव्य प्रवेश कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शहर संघटिका निलम ढवण, आणि विभागप्रमुख मनोज मयेकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मिरा भाईंदर परिसरात नवे राजकीय बळ मिळाले आहे. इमरान हाशमी यांच्या नेतृत्वाखालील हा गट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपच्या पारंपरिक गडात महत्त्वाचे खिंडार पाडणारा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक नेत्यांना आपल्या गटात सामावून घेण्याच्या ठाकरे गटाच्या धोरणाला या प्रवेशामुळे मोठे यश मिळाले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विकास राजकीय समीकरणांमध्ये आमूलाग्र बदल घडविणारा ठरू शकतो.



