काँग्रेसचा मनसेसोबत आघाडी करण्यास ठाम नकार!
बाळासाहेब थोरात यांची स्पष्टोक्ती — “काँग्रेस कोणत्याही स्थितीत मनसेसोबत जाणार नाही”
मुंबई : आगामी मुंबई महापालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात काँग्रेसने आज स्पष्ट संदेश देत मनसेसोबत कोणतीही आघाडी होणार नाही, असा ठाम निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी “काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नाही,” अशी भूमिका जाहीर करत संभाव्य आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
नाशिक येथे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. संगमनेर येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या बंद दाराआड चर्चेत त्यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत अनेक गैरसमज दूर केले. “मी नगर आणि नाशिक वेगळं मानत नाही, त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे येत असतात. नाशिकच्या बैठकीत सीपीआयच्या प्रतिनिधींनी मला आमंत्रण दिलं होतं; कोण उपस्थित राहणार आहे, हे मला माहीत नव्हतं,” असं थोरात यांनी स्पष्ट केलं.
माध्यमांमधील अफवांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, “मीडियाने वेगळा अर्थ लावू नये. हर्षवर्धन सपकाळ हे आमचे प्रांताध्यक्ष आहेत, आम्ही नेहमीच एकत्र काम केलं आहे आणि पुढेही करणार आहोत.”
थोरात यांच्या या विधानाने काँग्रेसची निवडणूक रणनीती स्पष्ट झाली आहे. काही दिवसांपासून मनसेसोबत काँग्रेसची संभाव्य आघाडी होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, थोरात यांच्या ठाम भूमिकेमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस आता मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं संकेत स्पष्टपणे दिसत आहेत.



