छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
शहरात निर्दयीपणाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे. बोलत बोलत एका तरुणाच्या छातीत चाकू खुपसून हत्या करण्यात आली. या घटनेत विपुल मधुकर चाबूकस्वार (वय २७, रा. तोरणगडनगर, सिडको) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री साडे दोनच्या सुमारास रामनगर, जालना रोडवरील सर्व्हिस रोडलगत घडली.
( खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये आपण घटना सविस्तर बघू शकतात )
या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आशिष गौतम चौथमल आणि सुबोध भास्कर देहाडे (दोघे रा. मुकुंदवाडी) यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विपुल रामनगरमध्येच राहत होता. सोमवारी तो मित्र अजय वाघ याच्यासोबत दिवसभर फटाक्याच्या दुकानात होता. रात्री दुकान बंद करून दोघेही परिसरात गप्पा मारत बसले होते. रात्री सुमारे २.३० वाजता दोघे विठ्ठलनगर चौकातून मोपेडवरून रामनगरच्या सर्व्हिस रोडने जात असताना गॅस पंपाजवळ विपुलचा मित्र कुणाल रिक्षात बसलेला दिसला. त्याच्यासोबत वैभव चव्हाणही होता.
तेवढ्यात हल्लेखोर सुबोध आणि आशिष तेथे पोहोचले. जुन्या वादावरून झालेल्या तीव्र वादात आशिषने अचानक चाकू काढून विपुलच्या डाव्या छातीत खुपसला. काही क्षणातच विपुल जमिनीवर कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.



