(छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी ) दि. 21 वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर पोलिस प्रशासनाने या मोर्चाचे ठिकाण बदलण्याची विनंती केली होती. प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा असा प्रस्ताव दिला होता, मात्र अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रशासनाचा हा प्रस्ताव ठामपणे फेटाळला आहे.
औरंगाबाद पोलिसांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. पण बाळासाहेब आंबेडकर यांनी दोनच स्पष्ट अटी ठेवल्या.
1️⃣RSS ची नोंदणी झालेली असेल, तर तिचे प्रमाणपत्र दाखवा;
2️⃣ RSS ही अनधिकृत संघटना असेल, तर तिच्यावर गुन्हा दाखल करा; त्यानंतर आम्ही मोर्चा रद्द करू.
“या दोन्हीपैकी काहीच कारवाई झाली नाही, तर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही,” अशी ठाम भूमिका बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.
शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात RSS कडून विना परवानगी नोंदणी स्टॉल लावण्यात आला होता. या कृतीला वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीचे शहराध्यक्ष राहुल मकासरे यांनी विरोध केला होता. परंतु उलट पोलिसांनी मकासरे यांच्यावरच गंभीर गुन्हे दाखल केले. या अन्यायाच्या विरोधातच RSS कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीने आज पोलिस आयुक्तांना भेटून “जनआक्रोश मोर्चा” काढण्याची परवानगी मागितली होती, मात्र पोलिसांनी ती नाकारली.
त्यावर आघाडीने जाहीर केले —
“परवानगी असो वा नसो, मोर्चा काढणारच!”
शहरातील सर्व फुले-शाहू-आंबेडकरवादी पक्ष, संघटना, कार्यकर्ते आणि जनता यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद शहरतर्फे करण्यात आले आहे.



