परभणी l संजय बगाटे
मागील चाळीस वर्ष बुद्ध भीम गीत गायनाच्या माध्यमातून समाजाची सेवा करत प्रबोधनात्मक चळवळीत योगदान देणारे व कलावंतांच्या अनेक परिषदांचे आयोजक असणारे कलाभूषण म्हणून परिचित शाहीर नामदेव लहाडे यांचे आज १९ ऑक्टोबर रोजी दीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीत हळहळ व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील असंख्य आंबेडकरी कवी गायकांचा त्यांचा संपर्क होता.त्यांनी अनेक आंबेडकरी कलावंत परिषदेचे आयोजन केले होते.
भारतीय कला महासंघाचे ते संस्थापक अध्यक्ष होते तर ज्येष्ठ कवी गायक विष्णू शिंदे यांचे ते विश्वासू म्हणून ओळखले जायचे. विष्णु शिंदे याच्या सोबत त्यांनी परिवर्तन कला महासंघ परभणी जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र लोक कलावंत सांस्कृतिक मंच मराठवाडा अध्यक्ष म्हणूनही काम केले.
एक महिन्यापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा आजार होता आज त्यांचे दुपारी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर २० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता पिंगळी रोड वरील स्मशान भूमीत अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रसिद्ध भीमशाहीर कवी गायक गंगाधर लहाडे यांचे ते भाऊ होत.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या दुःखद निधनाने आंबेडकरी सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.



