निळे प्रतीक न्युज नेटवर्क | छत्रपती संभाजीनगर
देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय म्हणून रामजन्मभूमी हिंदूंना देण्यात आली, मग त्याच ‘श्रद्धेच्या निकषांवर’ बोधगयेतील महाबोधी महाविहार बौद्धांच्या हवाली का होत नाही? असा थेट आणि खडा सवाल अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी रविवारी केला. ते भिक्खू करूणानंद थेरो यांच्या महाथेरो समारंभ व कठीण चिवरदान धम्मसोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी मिलिंद महाविद्यालय मैदानावर बोलत होते. या वेळी देशभरातून हजारो उपासक-उपासिका उपस्थित होते.
*“न्याय धर्मावर नाही, धर्माच्या नावावर ठरतोय!”*
भीमराव आंबेडकर म्हणाले, किं “अयोध्येतील रामजन्मभूमीचा निकाल देताना ती देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असल्याचे सांगितले गेले आणि ती हिंदूंना देण्यात आली. पण बोधगयेतील महाबोधी महाविहार हा जगभरातील कोट्यवधी बौद्धांच्या श्रद्धेचा विषय असताना, आमच्याकडे मात्र पुरावे मागितले जातात. न्याय कोणत्या धर्माचा पक्षकार आहे हे पाहून दिला जातोय का?”असे त्यांनी सांगितले, “अयोध्येत उत्खनन करताना बौद्ध धम्माशी संबंधित अवशेष सापडले. आम्ही रामजन्मभूमी बौद्धांची असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आणि आमच्या वकिलालाच दंड ठोठावला.”
*“सम्राट अशोकांचे कार्य विसरले, बौद्ध इतिहास पुन्हा लिहा!”*
आंबेडकर पुढे म्हणाले कि, “आज भारताला महासत्ता बनवण्याची चर्चा आहे, पण दोन हजार वर्षांपूर्वी बौद्ध राजांच्या काळातच भारत महासत्ता होता. त्या काळात नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला यांसारखी विद्यापीठे होती. त्या गौरवशाली इतिहासाची पुन्हा मांडणी करावी लागेल.”
त्यांनी आवाहन केले की, “प्रत्येक धम्मसोहळ्यात भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक या तिघांच्या प्रतिमा ठेवाव्यात. सम्राट अशोक जयंतीही तेवढ्याच थाटात साजरी व्हावी.”
*“धर्माच्या रकान्यात बौद्ध, जातीच्या रकान्यात तुमची जात लिहा”*
देशात लवकरच जातनिहाय जनगणना होणार आहे. या संदर्भात आंबेडकर म्हणाले, “धर्माच्या रकान्यात बौद्ध आणि जातीच्या रकान्यात तुमची मूळ जात लिहा. तुम्ही महार, मातंग, चांभार या जातीतून बौद्ध धम्म स्वीकारला असेल, तरी ती जात नमूद करा. त्यातून देशात धम्मक्रांती किती वेगाने वाढतेय, हे दिसेल.”
*“महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात सहभाग द्या”*
बोधगयेतील महाबोधी महाविहार हा सम्राट अशोकांनी बांधलेला, तथागत भगवान बुद्धांना संबोधी प्राप्त झालेला जगातील सर्वोच्च पवित्र स्थळ आहे. तो बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी सध्या आंदोलन सुरू आहे. “प्रत्येक बौद्धाने या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन भिक्खू संघाने केले.
*भिक्खू करूणानंद थेरो यांना “महाथेरो” पदवी प्रदान*
भिक्खू करूणानंद थेरो यांच्या वीस वर्षांच्या सेवा प्रवासाचा गौरव म्हणून त्यांना भिक्खू संघाच्या वतीने “महाथेरो” ही पदवी देण्यात आली. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व कठीण चिवरदान प्रदान करण्यात आले.
*परित्राण पाठाने सुरुवात, “भीमायन” संगीत मैफलीने सांगता*
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकरांनी लावलेल्या बोधीवृक्षाजवळील परित्राण पाठाने झाली. धम्मध्वजारोहणानंतर दिवसभर प्रेरणादायी धम्मदेसना आणि संध्याकाळी “गीत भीमायन” या संगीत मैफलीने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमात भिक्खू शरणानंद महाथेरो, डॉ. खेमधम्मो, भिक्खू उपगुप्त महाथेरो, प्रा. प्रदीप रोडे, डॉ. वैशाली प्रधान, उपायुक्त रविंद्र जोगदंड, प्रकल्प संचालक अशोक सिरसे, अधीक्षक अभियंता एस.एस. भगत आदी मान्यवर उपस्थित होते.



