*
छत्रपती संभाजीनगर दि.10 (जिमाका) – मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्याच्या पशूधनास चारा उपलब्ध व्हावा यासाठी पशुसंवर्धन ,कृषी विभागआणि रोहयो यांच्या संयुक्त विद्यमाने उपाययोजना करून चारा उपलब्ध करून द्यावा, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जिल्हा अग्रणी बँकेच्या ग्रामीण प्रशिक्षण केंद्रअंतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे असे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी आज बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस रोहयोच्या उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नानासाहेब कदम, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे उपनिबंधक समृद्ध जाधव ,शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत व्हावी ,त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच शिक्षण आणि प्रशिक्षण याच्या माध्यमातून रोजगार, उपलब्ध करुन आर्थिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत करण्यात येतो. यासाठी कृषी विभाग, पशुसंवर्धन, सहकार त्याचप्रमाणे रोजगार हमी योजना यांच्या अंतर्गत असणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी चारा उपलब्धता, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या पाल्यांना प्रशिक्षणातून रोजगार तसेच कर्जमाफी संदर्भात असलेल्या शासन निर्णयाप्रमाणे लाभ देण्याचे सूचना ॲड. हेलोंडे पाटील यांनी बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. अकरावी ते पदवी पर्यंतच्या शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांकडून फीस किंवा शुल्क आकारले जाऊ नये याबाबत शिक्षण विभागाने योग्य ते निर्देश संबंधित शाळा, महाविद्यालय देण्याचे सुचित करण्यात आले. जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून ग्रामीण प्रशिक्षण संस्थेंच्या अंतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण, निवास व्यवस्थासह उपलब्ध असल्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पाल्यांना यामध्ये प्राधान्य देऊन प्रशिक्षणाचा लाभ द्यावा तसेच त्यांना आर्थिक सक्षमीकरणासाठीचे व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यात उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या अंतर्गत 116 एकर जमीन अवैध सावकारी पाशातून मुक्त करून मूळ शेतकऱ्यांना जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल सहकार विभागाचे ॲड. हेलोंडे पाटील यांनी अभिनंदन केले. शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून चारा लागवड करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. यामध्ये भूमिहीन शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व यासाठी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतची निवड करून आवश्यक ठिकाणी भूमिहीन मजुरांना याबाबतचा निधी देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.



