“सम्राट अशोक जगाला दाखवणारा जेम्स प्रिन्सेप” – इंजि. भास्कर म्हस्के
धम्मलिपी संशोधक जेम्स प्रिन्सेप यांच्या २२६व्या जयंतीनिमित्त साकेत बुद्ध विहारात कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर :
“सम्राट अशोक यांची धम्मलिपी ही जगासमोर आणणारा पुरुष म्हणजे जेम्स प्रिन्सेप होय. त्याने केवळ भारतालाच नव्हे तर जगाला अशोक व बौद्ध धम्माचे खरे दर्शन घडवले,” असे प्रतिपादन इंजि. भास्कर म्हस्के यांनी केले.
जेम्स प्रिन्सेप यांच्या २२६व्या जयंतीनिमित्त साकेत बुद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
इंजि. म्हस्के यांनी प्रिन्सेप यांच्या कार्याची ऐतिहासिक माहिती देताना सांगितले की, १८१९ मध्ये भारतात आल्यावर प्रिन्सेपला अभियांत्रिकी व वास्तुकलेची आवड होती. वाराणसी टांकसाळीतील भट्ट्यांचे तापमान मोजणारी उपकरणे, ०.१९ ग्रॅम वजन तोलणारे काटेकोर तराजू, चर्च व पूल बांधणी, औरंगजेबच्या मिनारांची दुरुस्ती, सांडपाणी वाहून नेणारी भूमिगत भुयारे अशा अनेक कल्पक कामांनी त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली.
परंतु त्याची खरी ओळख जगाला झाली ती शिलालेख व नाण्यांच्या अभ्यासातून. प्राचीन नाण्यांवरील अक्षरे आणि अलाहाबाद स्तंभावरील लिपी यांमध्ये साम्य दिसल्याने त्याने या गूढाचा शोध सुरू केला. बिहारमधील बेतिहा येथून मिळालेले शिलालेखांचे ठसे, ओरिसातील शिल्पलेख, इंडो-ग्रीक नाण्यांचा अभ्यास, खरोष्ठी लिपीचा शोध यामुळे त्याचे संशोधन जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले.
शिलालेखातील अभ्यासातून त्याने “दानं” हा शब्द प्रथम उलगडला. १८३७ मध्ये भारतीय शिलालेखांचा कोड त्याने वाचला. त्यानंतर सम्राट अशोकांच्या शिलालेखात वारंवार आलेला “देवानांपिय पियदस्सिन” हा कोण आहे हा प्रश्न त्याला पडला. महावंशातील संदर्भ, तसेच जॉर्ज टर्नर याने श्रीलंकेतून पाठविलेल्या पाली ग्रंथांच्या मदतीने अखेर देवानांपिय पियदस्सिन म्हणजेच सम्राट अशोक असल्याचे प्रतिपादन त्याने सिद्ध केले.
या शोधामुळे २२०० वर्षे विस्मृतीत गेलेला अशोक पुन्हा जगासमोर आला. न्याय, नीती व लोककल्याण यांचा धम्ममार्ग सर्व शिलालेखांत एकच सूत्र म्हणून दिसतो. १९१५ मध्ये कर्नाटकातील मस्की येथील शिलालेखात “अशोक” हे नाव मिळाल्याने प्रिन्सेपच्या संशोधनाची अचूकता पटली.
प्रिन्सेपने भारतातीलच नव्हे तर अफगाणिस्तानातील शिलालेखांचा अभ्यास करून भारत-ग्रीक संबंध व इतर राजांचा इतिहासही उलगडला. भारतीय शिलालेखांच्या सर्वात प्राचीन लिपी – धम्मलिपी व खरोष्ठी यांचा शोध घेऊन त्याने बौद्ध धम्म व भारतीय इतिहासाच्या नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली.
इंजि. म्हस्के म्हणाले, “अशोक व बौद्ध धम्माची खरी ओळख जगासमोर आणणाऱ्या जेम्स प्रिन्सेप व लॉर्ड कॅनिंगहॅम यांच्या प्रतिमा प्रत्येक विहारात लावून त्यांचा गौरव करणे, हीच खरी आदरांजली ठरेल.”
या कार्यक्रमानिमित्त भन्ते श्रद्धारक्षित यांनी प्रिन्सेप यांच्या जीवनकार्यावर समायोचित देशना दिली. साकेत बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी, उपासक-उपासिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



