मुंबई दि. ११ (रामदास धो. गमरे) “मानवाचे जीवन अनित्य आहे आणि ते दुःखसमूहांनी व्यापलेले आहे तथागत बुद्धांनी साधनेच्या माध्यमातून साक्षात्कार केलेल्या चार आर्यसत्यांमध्ये या दुःखाच्या स्वरूपाचे, कारणांचे, त्याच्या निरोधाचे आणि निरोधाला नेणाऱ्या मार्गाचे स्पष्ट दर्शन होते, १) दुःखाचे सत्य (दुःखसत्य) – जन्म, जरा, व्याधी, मृत्यू, प्रिय व्यक्तीपासून वियोग, अप्रिय व्यक्तीचा संग, इच्छा पूर्ण न होणे इत्यादी सर्व अनुभव हे दुःख आहेत. २) दुःखसमुदय सत्य – हे दुःख तृष्णा (आसक्ती, लालसा) यामुळे उद्भवते. ३) दुःखनिरोध सत्य – तृष्णेचा पूर्ण क्षय झाल्यास दुःखाचा निरोध होतो ४) दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा सत्य – दुःखाचा निरोध साधण्यासाठी असलेला मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय, ही चारही आर्यसत्ये जशी आहेत तशी जाणणे म्हणजेच त्यांच स्वरूप, कारण, परिणाम आणि साधनाचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करणे यालाच सम्यक दृष्टि म्हणतात बुद्धांच्या या साक्षात्काराला धम्मचक्रप्रवर्तन असे म्हणतात या ज्ञानामुळेच तथागतांना सम्यक संबुद्ध म्हटले जाते. बुद्धांचा आर्य अष्टांगिक मार्ग हा मार्ग मध्यम आहे अति भोग आणि अति तप या दोन्ही टाळून, संतुलित साधनेच्या आठ अंगांचा यात समावेश आहे ती म्हणजे १) सम्यक दृष्टि – चार आर्यसत्यांचे आणि वास्तवाचे योग्य आकलन २) सम्यक संकल्प- अहिंसा, वैराग्य, करुणा युक्त विचार ३) सम्यक वाणी – असत्य, कठोर, अपवाद आणि निरर्थक वाणी टाळणे ४) सम्यक कर्म – हिंसा, चोरी, दुराचार यांचा त्याग करून शुद्ध आचरण ५) सम्यक आजीविका – हानिकारक, अन्यायकारक व्यवसाय टाळणे ६) सम्यक व्यायाम – कलुष दूर करण्यासाठी आणि पुण्यगुण वाढवण्यासाठी प्रयत्न ७) सम्यक स्मृती – शरीर, भावना, चित्त आणि धर्म यांचे सतत सजग निरीक्षण ८) सम्यक समाधी – चित्त एकाग्र करून ध्यानाच्या उच्च अवस्थेत स्थिर करणे; हा मध्यम मार्ग व्यक्ती आणि समाज यांच्यात संतुलन प्रस्थापित करतो. तो व्यक्तीला आत्मिक मुक्तीकडे नेतो आणि समाजाला नैतिक व सुसंस्कृत करतो. हाच तथागत बुद्धांचा उपदेश म्हणजेच दुःखातून मुक्तीचा आणि निर्वाणाचा मार्ग होय, भगवान बुद्ध म्हणतात आत्मा कोणीही पाहिला नाही किंवा कोणीही आत्म्याशी संभाषण केलेलं नाही आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे असे जे समजतात ती गोष्ट आत्मा नसून मानवी मन आहे जो आत्म्यापासून भिन्न आहे कारण आत्मा हा धर्मावर आधारित आहे आणि धर्म केवळ कल्पनामिश्रित आहे मी साधनेच्या माध्यमातून माझ्या शरीराचे आतील आणि बाहेरील भाग तपासून पाहिले तर आत बाहेर मला एकूण ३२ प्रकारचे आयतने मिळाली पण आत्मा नावाचा घटक कुठेही सापडला नाही, माणसाचे शरीर हे पाच घटकांनी म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, चित्त यांनी बनलेले असून या पाच घटकांचे जेव्हा संयोजन होते तेव्हा एक जीवसत्व शरीर जन्माला येते या पाच घटकांचे जेव्हा पृथक्करण होते तेव्हा जीवसत्वाचे विघटन होऊन शरीर निर्जीव होते व त्यालाच आपण मृत्यू म्हणतो, बुद्ध सांगतात शरीरामध्ये डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा व मन ही सहा अंतर्गत आयतने आहेत तर रूप, वेदना संज्ञा, संस्कार, विज्ञान, रूप, शब्द, वास, रस, स्पर्श, धर्म ही बाह्य आयतने आहेत म्हणजे डोळ्याने रूप पहाता येते, कानाने – शब्द ऐकता येतो, नाकाने – गंध वास घेता येतो, जिव्हा – जीभेने चव घेता येते, त्वचा – त्वचेने स्पर्श करता येतो. मन – मनाने धम्म जाणता येतो व यांच्या समन्वयाने संवेदना निर्माण होते ही संवेदना सुखद किंवा दुःखद असते म्हणून संवेदनांचा अनुभव घेण्यासाठी पंचस्कंध समजून घेणे आवश्यक आहे, मानवाचे अस्तित्व पाच उपादान स्कंधांवर (aggregates) आधारित आहे ते म्हणजे रूप (शारीरिक घटक), वेदना (संवेदनांचा अनुभव), संज्ञा (ओळख), संस्कार (विचार, प्रवृत्ती, इच्छाशक्ती) व विज्ञान (चेतना) हे पाचही स्कंध अनित्य, दुःखमय आणि अनात्म आहेत. यांच्यावर आसक्ती धरल्यामुळे ‘अहंकार’ निर्माण होतो, आणि हा अहंकारच सर्व दुःखाचे मूळ कारण आहे व माणसातील अहंकाराचा अतिरेक हे जगातील दुःखाचे मुळ कारण आहे.” असे प्रतिपादन बौद्धजन सहकारी संघ आयोजित ऑनलाईन वर्षावास प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प गुंफत असताना “चार आर्यसत्य” या विषयावर प्रमुख वक्ता म्हणून बोलत असताना बौद्धाचार्य संदीप गमरे यांनी केले.
बौद्धजन सहकारी संघ संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पातळीवर गाव शाखेच्या व मुंबई येथे मुंबई शाखेच्या एकमताने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत चाललेल्या वर्षावास प्रवचन मालिकेद्वारे गावागावात, घराघरात धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्कार्य संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, सदर प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली Google Meet app द्वारे ऑनलाईन पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले, सदर पाचव्या पुष्पाच्या प्रसंगी बौद्धजन सहकारी संघाचे माजी विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे व परिवारास पूजेचा मान देऊन त्यांच्या शुभहस्ते पूजाविधी संपन्न करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना संघाचे तालुका सरचिटणीस संदेश गमरे यांनी प्रभावी व लाघवी भाषाशैलीत केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी अध्यक्षीय भाषणात “संदीप गमरे यांनी ‘चार आर्यसत्य’ या विषयावर जे प्रभावी व्याख्यान दिले त्याबद्दल त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले, तसेच बौद्धजन सहकारी संघाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या पतसंस्थेच्या वर्धापणदिन व विशेषांक प्रकाशन दि. १७ ऑगस्ट २०२५ शृंगारतळी येथे करण्यात येणार आहे तरी सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.” असे नमूद करीत सर्वांना मंगलकामना दिल्या.
सदर कार्यक्रमास गाव व मुंबई या दोन्ही शाखांतील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच माजी विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, बौद्धाचार्य व्याख्याते संदीप गमरे गुरुजी, गाव व मुंबई शाखेचे आजी माजी विश्वस्त, आजी माजी कार्यकारिणी, उपासक, उपासिका, हितचिंतक व उपस्थितांचे आभार मानून संस्कार समितीचे चिटणीस सचिन मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.