नवी मुंबई येथे जातीय मानसिकतेतून बौद्ध तरुणावर अत्याचार; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली पीडितांची भेट.
नवी मुंबई : दि १३ नवी मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका बौद्ध तरुणावर अमानुष अत्याचार करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ऐरोली सेक्टर 1 येथील छत्रपती रहिवासी चाळ परिसरात जातीय मानसिकतेतून बौद्ध समाजातील सुनील जाधव यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
रोहित महाजन, त्यांची पत्नी स्वाती महाजन आणि विशाल महाडिक असे आरोपींचे नाव आहे. या तिघा आरोपींनी एकत्र येऊन जाधव यांना मारहाण केली. तसेच बरदस्तीने त्यांच्या पायावर नाक घासायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तुमच्या जयभीम वाल्यांची लायकी हीच आहे” असे म्हणत अंधारात ओढत नेऊन मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी, नवी मुंबई जिल्हा कमिटीने तातडीने हालचाल केली. जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप आणि महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पिडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या मनोबलात भर घातली.
“वंचित बहुजन आघाडी ठामपणे तुमच्या सोबत आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहू,” अशी ग्वाही त्यांनी कुटुंबाला दिली. दरम्यान, या प्रकरणात रबाळे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 115(2), 352, 351(2), 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
मात्र, आरोपी अद्याप फरार असून अटक करण्यास पोलिस विलंब करत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. “आरोपींची तात्काळ अटक व कठोर शिक्षा होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही,” असा इशारा जिल्हाध्यक्ष जगताप व रणदिवे यांनी दिला.
या भेटीदरम्यान कविता हिवाळे, मायाताई मनवर, संदीप वाघमारे, मल्लिनाथ सोनकांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



