संभाजी नगर : दि. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी पसरली असून, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबीसी समाजाची ताटे वेगळी ठेवली पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर काढला. या निर्णयावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, सरकारचा हा निर्णय कायद्याला धरून नाही. औरंगाबाद खंडपीठाच्या एका जुन्या निर्णयाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही, यावर सुप्रीम कोर्टानेही शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे सरकारने घेतलेली ही भूमिका चुकीची आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “जरांगे पाटील हे श्रीमंत मराठा समाजाचा लढा लढत आहेत. त्यामुळे ते गरीब मराठा समाजावर अन्याय करत आहेत.” सरकारवर आरोप करताना ते म्हणाले, “निझामी मराठा जो सत्तेत आहे, त्याला गरीब मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावायचे आहे. भाजप एका दगडात अनेक पक्षी मारत असून, आरक्षणावरच गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.”
ओबीसींना राजकीय धोका ओळखण्याचा इशारा
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला सतर्क राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, भाजपने ओबीसींना आपला डीएनए म्हटले असले तरी, ओबीसींनी भाजपला आपला सर्वात मोठा शत्रू मानले पाहिजे. मंडल आयोग वाचवणे आता ओबीसींच्या हातात असून, त्यांनी आपले राजकीय अस्तित्व मजबूत केले पाहिजे. केवळ दोन-चार ओबीसी जिल्हा परिषदेला निवडून येण्याऐवजी, संपूर्ण ओबीसी बॉडी कशी निवडून येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.
या घटनेमुळे, मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजातील वाद अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे हैदराबाद गॅझेटमुळे मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, असे काही अभ्यासक म्हणत आहेत, तर दुसरीकडे ओबीसी नेते या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याचा आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर, आता हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.



