आंबेडकरी चळवळीतील सक्रीय कार्यकर्त्या, साहित्यिका, व्याख्यात्या विद्या भोरजारे यांच्याशी माझे गेले बारा- तेरा वर्षापासून वैचारिक ऋणानुबंध आहेत. आमची पहिली भेट आंबेडकर भवन दादर येथे 27 मे 2014 ला डॉ. रेखा मेश्राम मॅडम यांनी आयोजित केलेल्या रमाई संमेलनात झाली होती. त्यावेळी मी नुकताच संपादीत केलेला रमाई काव्यसंग्रह त्यांना भेट दिला. त्यांनंतर नांदेड येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे बरेचवेळा येणे झाले. नेहमीच्या भेटीमुळे नात्याची विण घट्ट होत गेली. याला कारण विद्या भोरजारे मॅडम या करुणावादी स्वभावाच्या आहेत. नातं जोडणेे आणि टिकवणे हे त्यांच्या स्वभावाचे गुण वैशिष्ट्य आहे. नांदेड येथून सुरेश दादा गायकवाड यांचे दैनिक शिल्पकार हे वर्तमानपत्र निघत होते, या वृत्तपत्रामधून विद्या भोरजारे मॅडम विविध विषयावर लिखाण करीत असत. त्यामुळे नांदेड शहरात माझ्यासह आणखी काही बौद्ध बांधव भगीनींशी त्यांचे स्नेहाचे सबंध आहेत.
विद्या भोरजारे लिखीत ‘कांची’ या कादंबरीचे नागपूर येथे थाटात प्रकाशन झाले. तेंव्हा त्या प्रकाशन सोहळ्यात माझ्या दोन मित्रांना घेऊन मी उपस्थित होतो. विद्या भोरजारे यांना पूर्वकल्पना न देता. मला हॉलमध्ये पाहून त्या अत्यंत खूष झाल्या. आगत्याने त्यांनी माझे स्वागत केले व पुस्तक भेट दिले आणि घरी चला म्हणून आग्रह केला. पण वेळेअभावी आम्ही त्यांच्या घरी जाऊ शकलो नाही. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या डॉ. धनराज डहाट, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. प्रकाश खरात, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, ई.मो. नारनवरे, डॉ. चंद्रकांत वानखेडे, डॉ. सुनंदा जुल्मे आणि अन्य मान्यवरांची भेट झाली. सर्वांशी भेटीगाठी घेऊन आम्ही नांदेडला परतलो.
काल विद्या भोरजारे यांची ‘कांची’ कादंबरी वाचून झाली. तीनशे अठ्ठावीस पानाची मोठी कादंबरी आहे. जी शेवटपर्यंत फ्लॅशबॅक मध्ये दाखवली आहे. एका स्रिचा आवाज ज्या ताकतीने उभा केला जो धारदार आहे. नायिकेच्या संघर्षाची, दुःखाची आणि जागृतीची खूप प्रभावी आणि वास्तवदर्शी कादंबरी वाटली, वाचताना मन हेलावून गेले. त्या निमित्ताने दोन शब्दं लिहावं वाटलं. मी समिक्षक नाही, कवी आणि कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्या मनाला जे भावलं, जसं जमलं तेच थोडक्यात लिहीत आहे.
साहित्य हे समाजाचा आरसा असतो असं म्हणतात आणि जेंव्हा स्रिच्या जीवनाचे दुःख, संघर्ष आणि उन्नतीचे वास्तव चित्रण तथा सभोवतालच्या घटनांचे प्रतिबिंब त्या आरशात उमटते तेंव्हा साहित्य सामाजिक परिवर्तनाचे माध्यम ठरते. ‘कांची’ ही अशाच प्रकारची प्रेरणादायी आणि प्रभावी स्त्रीवादी कादंबरी आहे. या कादंबरीची नायिका ‘कांची’ ही एक नामांकित नृत्यांगणा असते. पण, विवाहानंतर तिच्या जीवनात खूप बदल होतो. अत्यंत सोज्वळ आणि संयमी स्वभावाची. विवाहानंतर नुसते वैवाहीक आयुष्य नव्हे तर पितृसत्ताक व्यवस्था अनुभवते. कर्तव्यशील जीवनसाथी मिळूनही तिचा पती सागर तिला प्रचंड छळतो, तिला टाळतो. सागर हा दुहेरी व्यक्तीमत्वाचा दाखवला आहे. सुरवातीला अत्यंत आक्रमक, कुकर्मी तर अंततः करुण, गंभीर आणि नम्र…!
भारत देशात स्रियांवर होणार्या अत्याचाराच्या कहाण्या आपण वाचल्या आणि अनुभवल्या. पण, ‘कांची’ या कादंबरीत लेखिकेने नविन पद्धतीने सांगून नायिकेने संकटाचे पहाड पार करून स्वतःला जगाशी जोडलेलं दाखवले आहे. विशेष म्हणजे पुराणमतवादावर लेखिकेने कडाडून विरोध केलेला आहे.
सागर आणि कांची च्या संसारातल्या परिस्थितीचे ह्वदयद्रावक आणि विदारक चित्र रंगवलेले आहे. कांची केवळ एका स्त्रीचे कथानक नाही, तर विविध माणसांचे विविध स्वभावाचे, रंग रूपाचे अमानुषपणाचे आणि मानवतावादाचे चित्रण वाचायला मिळते. तसेच कांची च्या आयुष्यातला दाह, तिच्या नवर्याचा अन्याय, समाजाचा द्वेश, लैंगीक भेदभाव, आर्थिक परावलंबन, एकाकीपण, मुलांना किनारा लाभावा म्हणून तिची धडपड, हे सगळे प्रसंग जे वाचकाच्या काळजाला भिडते.
ही कादंबरी केवळ दुःख मांडत नाही तर दुःखातून उभारी कशी घेतली जाते, याचे उदाहरण ठरते. जिथे आधी पराभूत होते, पण नंतर उठून उभे राहून परंपरेची चौकट ओलांडून स्वतःचं विश्व घडवते. इथेच स्रिवादाची जाणीव होते. स्त्रीला मदतीची नव्हे तर संधीची गरज आहे हे वाचताना कळून येते. स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा प्रवास हेच या कादंबरीचे बलस्थान ठरतं.
कांची च्या हताशपणाची, नंतर तिच्या अस्तित्वाच्या उजेडाची, दोन मुलांच्या दोन दिशांची आणि सभोवतालच्या आक्रोशाची, परिवर्तनाची तसेच आयुष्यभर *कांची* ला छळणारा, दुर्दशा करणारा सागर चांगला माणूस बनतो. त्याच्या मधला अहंकार नष्ट होऊन तो नम्र रूप धारण करतो. धम्माच्या वाटेने निघून जातो. ही कादंबरी वाचताना एखाद्या सिनेमाची स्टोरी वाचत आहोत, अशाप्रकारे दृष्य डोळ्यापुढे उभे राहते. कादंबरीतील भाषा आणि लेखनशैली प्रभावशाली असून वाचकाला खिळवून ठेवणे हेच लेखिकेच्या लेखनाचे खास वैशिष्ट्ये आहे. हे कथानक स्त्रियांनीच नव्हे तर पुरूषांनी वाचावे, वाचकांच्या विचाराला यात बरच खाद्य मिळेल व वाचक अंतर्मुख होईल.
यात एका महत्वपूर्ण विधानावर लेखिकेने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणजे बुद्धाचा मानवतावाद मानवी जीवनात पाळा. माणूसकी शिवाय दुसरं काही मोठे नाही. माणसाने माणसाशी माणूसकीने वागणे तसेच समतेची मंगल भावना मनात अंकुरली पाहिजे अशा बर्याच महत्त्वाच्या मुद्यांवर भर दिलेला आहे. जे वाचकांनी वाचल्यावर लक्षात येईल.
प्रस्तुत कादंबरीला लोकशाहीर म्हणून नावलौकिक असलेल्या संभाजी भगत दादाची समर्पक प्रस्तावना लाभलेली आहे. या युगाची आंबेडकरी स्त्री काय करू शकते, याचे पूर्ण दर्शन विद्या भोरजारे घडवतात, म्हणून मला ही कादंबरी महत्वाची वाटते. वाचक याचे जोरदार स्वागत करतील असे सांगून लोकशाहीर संभाजी भगत यांनी या कलाकृतीचे ठाम समर्थन केलेले आहे.
कांची ही समृद्ध सुंदर कलाकृती असून ती प्रबोधनात्मक अंगाने लिहीलेली आहे. स्त्री संघर्षाचा प्रवास विद्या भोरजारे यांनी या कलाकृतीत आगळ्यावेगळ्या शैलीने अभिव्यक्त केला आहे. कांची आणि सागर यांच्या आयुष्याने शेवटी एक निराळेच गंभीर वळण घेतले आहे, जे वाचकांना अस्वस्थ आणि अंतर्मुख करते. अशी वाचनीय कलाकृती वाचकांच्या हातात दिल्याबद्धल मी लेखिकेचे अभिनंदन करतो व अशीच निर्भय आणि प्रगल्भ लेखनाची वाट चालत राहावी अशी पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो.
– *सिद्धार्थ तलवारे, नांदेड*
मो.नं. 9923169617
*कांची (कादंबरी)*
*लेखिका – विद्या भोरजारे*
मो. 9975109438
*प्रकाशक -संकेत प्रकाशन नागपूर*
पृष्ठे- 328, किंमत रु. 350/-



