निळे प्रतीक न्यूज नेटवर्क,छत्रपती संभाजीनगर दि.२० वाळूज येथील राजश्री प्राथमिक विद्यालयात सातवीत शिकणाऱ्या ऋतुराज कांबळे या विद्यार्थ्यावर शिक्षक शहा यांनी अमानुष मारहाण केली. शिक्षणाचे मंदिर असलेल्या शाळेतच जर वंचित विद्यार्थ्यावर निर्दयी अत्याचार होत असतील तर ती समाजाला हादरवणारी बाब असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेनाने तीव्र निषेध केला असून न्याय मिळवून देण्यासाठी धाव घेतली आहे. पँथर सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता तथा युवक अध्यक्ष बंटी दादा सदाशिवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या संदर्भात निवासी जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन दिले.
निवेदनात स्पष्ट मागण्या करण्यात आल्या –
➡️ निर्दयी शिक्षक शहा आणि विद्यार्थ्याला तुच्छतेने वागवणाऱ्या शाळा चालकावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा.
➡️ पीडित विद्यार्थ्याला तातडीने न्याय व संरक्षण द्यावे.
➡️ अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात.पँथर सेनेने प्रशासनावरही ताशेरे ओढत म्हटले की, “वंचित मुलांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी मानसिक छळ, मारहाण केली जात असेल आणि प्रशासन याकडे डोळेझाक करत असेल, तर हा गुन्ह्यातील सहभाग मानला जाईल.”



