हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य
छावणी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी – २ लाख ७ हजारांचा मुद्देमाल ताव्यात
छत्रपती संभाजीनगर :
“माझ्या मुलाने वाढदिवसाला दिलेला गिफ्ट… माझ्या आईने प्रेमाने दिलेला मोबाईल… हप्त्याने घेतलेला फोन… हरवला म्हणून हृदयावर दगड ठेवला होता, पण तो पुन्हा मिळाल्याने समाधान व आनंद शब्दात सांगता येणार नाही!” — अशा भावना हरवलेला मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या.
छावणी पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून तब्बल २ लाख ७ हजार रुपये किमतीचे महागडे मोबाईल फोन परत मिळविण्यात आले. गेल्या काही महिन्यांत गुजरात, मध्यप्रदेश व इतर जिल्ह्यांमधून प्रॉपर्टी मिसिंग व चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.
सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार नंदू सूर्यवंशी यांनी CEIR पोर्टलचा वापर करून हरवलेले मोबाईल शोधून काढले. यात वनप्लस, ओप्पो, विवो, मोटो, रिअलमी, रेडमी, सॅमसंग यांसारख्या कंपन्यांचे मोबाईल ताव्यात आले.
मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी छावणी पोलीस स्टेशनचे आभार मानले. एका तक्रारदाराने सांगितले, “माझ्या आईने गिफ्ट म्हणून दिलेला मोबाईल हरवल्याने मनाला खूप लागलं होतं. तो पुन्हा हातात मिळाल्याने डोळ्यांत पाणी आलं.”
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उप आयुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले की,
“मोबाईल हरवला किंवा चोरी गेला तर त्वरित पोलीसांकडे तक्रार दाखल करावी. तक्रार मिळाल्यास शोधकार्य अधिक प्रभावीपणे करता येते.”



