लोकशाहीर वामनदादा कर्डक हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासातील एक तेजस्वी नाव आहे. त्यांचे आयुष्य म्हणजे काव्य, गीत आणि समाजसुधारणेचा अखंड संग्राम. त्यांनी आपल्या शब्दांमध्ये अशा ज्वाळा फुंकल्या की लाखो लोक जागृत झाले, प्रेरित झाले आणि अन्यायाविरुद्ध उभे राहिले.
वामनदादा यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ रोजी देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक या ठिकाणी झाला. गरिबी, जातीय भेदभाव आणि संघर्ष यांच्या सावटाखाली त्यांचे बालपण गेले. शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही, पण जिद्दीने वाचन-लेखन आत्मसात केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे अष्टपैलू होतं. त्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह : वाटचाल (१९७३), मोहळ (१९७६), हे गीत वामनाचे (१९७७) हे आहेत. तर आत्मचरित्र : माझ्या जीवनाचं गाणं (१९९६). त्यांनी शहरामध्ये तसेच खेड्यापाड्यात, संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरूषांच्या विचारांना आयुष्यभर लोकांपर्यत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. खास करून वामनदादा कर्डक यांना क्रांतीकारी भीमगीतांमुळे ओळख मिळाली तरीही त्यांची लोकगीते देखील जनमाणसांमध्ये प्रसिद्ध आहेत.
दादानी आपले लेखन केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर सामाजिक बदलासाठी केले. त्यांनी अस्पृश्यता, जातीय विषमता, शोषण, गरिबी, अंधश्रद्धा यांच्यावर ज्वलंत शब्दांत प्रहार केला. त्यांच्या गीतांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते.गाण्यांमध्ये राजकीय जाणीव, सामाजिक उपरोध आणि लोकमानसाला भिडणारी सहजता होती. भाषेत कोणताही आडपडदा नव्हता. गावातल्या बोली, लोकप्रचलित म्हणी, साध्या रूपकांचा वापर, आणि मधूनच एखादं धारदार राजकीय विधान हे त्यांचं वैशिष्ट्य, “भीमा तुझ्या मताचे पाच लोक असते” हे गीत केवळ मतदार जागृतीचं नव्हे, तर राजकीय संघटनेच्या गरजेचं प्रतीक आहे. तर “ज्योती पेटवून ठेव” हे गीत संघटनातील सततची ऊर्जा आणि सक्रियतेची आवश्यकता अधोरेखित करतं.“नीच नितीचा कापू गळा, त्या रक्ताचा लेवू टिळा मंजुळा, पाजळ आपूला विळा न चल ग रणामधी” या गीतातून वामनदादा महिलांना आवाहन करत आहेत की, खांद्याला खांदा लावून आता रणामध्ये लढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. पूर्वापार चालत आलेली स्त्री विषयक संकल्पना बदलावी लागेल अशी क्रांतिकारी हाक त्यांनी आपल्या या गीतातून दिली आहे. आज देखील स्त्रियांवर अत्याचार होताना आपणास दिसून येतात. दररोज बलात्काराच्या बातम्या वाचण्यात येतात अशा वेळी वामनदादा कर्डक यांचे गीत आठवत राहते.
वामनदादांनी भीमगीत या प्रकाराला एक नवा आयाम दिला. हे गीत फक्त संगीत नसून एक लढाईचं शस्त्र होतं. त्यांच्या गाण्यांनी आंबेडकरी चळवळीत नवा जोश आणला. हजारो लोक सभा-सोहळ्यात त्यांचे गाणे ऐकून प्रेरित होत असत. त्यांचं प्रत्येक गीत हे जणू एका आंदोलनाचं घोषवाक्य असायचं. मंचावर येताच ते फक्त गायक नव्हते — ते विचारांचे सैनिक बनायचे. वामनदादा हे प्रेक्षकांशी एकतर्फा संवाद साधणारे नव्हते. त्यांना लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधायला आवडत असे. गाणी म्हणताना ते श्रोत्यांच्या प्रतिक्रियांनुसार शब्द बदलत, एखादी ओळ पुन्हा म्हणत, आणि त्या क्षणी सभागृहात किंवा मैदानात एक वेगळंच वातावरण तयार होत असे. त्यांची कार्यक्रमं म्हणजे केवळ गायन नव्हे, तर विचारांचा उत्सव असायचा.
वामनदादांची गाणी केवळ एका काळापुरती नव्हती, तर ती आजच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवरही आहेत. आजही समाजात जातीय विषमता, महिला अत्याचार, अन्याय आणि शोषणाच्या घटना घडताना दिसतात. सोशल मीडियावर, आंदोलनांमध्ये, महापुरुषांच्या जयंती उत्सवांमध्ये त्यांच्या गीतांचा जयघोष ऐकायला मिळतो. तरुणाईतला यूट्यूब, इंस्टाग्राम रील्स आणि फेसबुकवर अनेक तरुण त्यांच्या गाण्यांना नवे बीट्स लावून सादर करतात. यामुळे नवीन पिढीला वामनदादांचा विचार आधुनिक स्वरूपात पोहोचतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार करणाऱ्या संघटना अजूनही त्यांच्या गीतांचा वापर संघटनात्मक कामासाठी करतात. संविधानावरील हल्ले, सामाजिक आरक्षणावरील चर्चा, आणि लोकशाही मूल्यांवरचा प्रश्न यावेळी वामनदादांची गाणी तरुणांना एकत्र आणणारे सांस्कृतिक शस्त्र ठरतात. दादाच्या गीतांची ताकद अशी आहे की ती पिढ्यान्पिढ्या लोकांच्या भावविश्वात ताजीतवानी राहतात. काळ बदलला, साधनं बदलली, पण त्यांचा संदेश आजही तितकाच थेट आणि धारदार आहे. वामनदादा कर्डक यांचे आयुष्य हे गीतांच्या माध्यमातून लोकजागृतीचे प्रतीक आहे. त्यांच्या लेखनातून आणि गायनातून आजही समाजातील विषमता उघड होते आणि संघर्षासाठी प्रेरणा मिळते. आजच्या पिढीतले अनेक लोकगीतकार, रस्त्यावरचे कवी, आणि सामाजिक कलाकार वामनदादांना आपला प्रेरणास्रोत मानतात. त्यांची परंपरा ही फक्त गाण्यांची नाही, तर विचारांची आणि संघर्षाची आहे.
—–
भूषण वसंत खोडके
ईमेल: khodkebhushan26@gmail.com
मोबाईल: 7719885555